शिवसेनेला गरज गनिमी काव्याची

By admin | Published: July 25, 2016 01:00 AM2016-07-25T01:00:03+5:302016-07-25T01:00:03+5:30

शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली.

Shivsena needs guerrilla poetry | शिवसेनेला गरज गनिमी काव्याची

शिवसेनेला गरज गनिमी काव्याची

Next

पिंपरी : शिवसेनेच्या वतीने प्राधिकरण येथे झालेल्या मेळाव्यात भारतीय जनता पक्षाच्या एककलमी कार्यक्रमाबद्दल जोरदार टीका करण्यात आली. महापालिकेत भाजपाशी युती करायची किंवा नाही, याबद्दल पक्षप्रमुख निर्णय घेतील. मात्र, गाफील राहू नका. सर्व जागांवर तयारी करा, असेही नेत्यांनी आपल्या भाषणातून सूचित केले. सत्तेसाठी वेळप्रसंगी गनिमी काव्याची गरज असल्याचेही मत व्यक्त केले.
लेवा पाटीदार भवनातील मेळाव्यास जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख बाबा धुमाळ, शहरप्रमुख राहुल कलाटे, महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे, युवाप्रमुख अमित गावडे आदी उपस्थित होते. भाजपाने शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवल्याने आजच्या मेळाव्यात याबाबत कोणता निर्णय होणार याबाबत चर्चा होती. यावेळी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनीही सत्तेत सहभागी असतानाही भाजपाकडून सुरू ठेवलेल्या एककलमी कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली.
गुलाबराव पाटील म्हणाले, ‘‘युतीबाबत चिंता करीत बसू नका. नगरसेवक व्हायचंय, ही खूणगाठ बांधा. मतदारांना विश्वास द्या. पक्षाच्या उमेदवाराला ताकद द्या.
खासदार आढळराव म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतीबाबत कसब्यातील नेते आमच्या परिसरात येऊन श्रेय घेतात. नाशिक रेल्वे, महामार्गाचेही श्रेय स्वतकडे घेतात. पंतप्रधानांचे काम चांगले असले, तरी खालच्या पातळीवर कीड लागलीय त्याबद्दल अस्वस्थता वाटते. त्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आठवड्याला पुण्यात येतात. ते पक्षाची ताकत वाढवायला लागलेत. त्यामुळे भ्रमात राहू नये.’’
खासदार बारणे म्हणाले, ‘‘न केलेल्या कामाचे श्रेय इतर पक्ष घेत आहेत. जाहिराती अ‍ॅप वापरून दिशाभूल करीत आहेत. घोषणांचा बाजार मांडला आहे. आपण सत्तेत असलो तरी सत्ता जमा झालेलो नाही. युतीचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील तो मान्य राहील.’’ डॉ. कोल्हे यांनी युतिचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगितले. आमदार चाबुकस्वार म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाशी युती केली तरी फायदा आणि नाही केली तरी फायदाच आहे.’’ वक्त्यांनी युतीबाबत थेट भाष्य न करता, गनिमी काव्याने लढण्याचा संकेत दिला. राहुल कलाटे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

Web Title: Shivsena needs guerrilla poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.