Shivsena: गद्दारांची गाडी फोडा म्हणणारा हिंगोलातील शिवसेना नेता पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:22 AM2022-08-03T09:22:12+5:302022-08-03T09:23:30+5:30
हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं वादग्रस्त विधान केलं होतं.
पुणे/हिंगोली - राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तसंच उद्धव ठाकरे देखील मुंबईत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षाला बळकटी देण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेत्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. मंगळवारी पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये, गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. दुसरीकडे हिंगोलीत शिवसेनेचे नेते बबनराव घोलप यांना पुणे पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.
हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं वादग्रस्त विधान केलं होतं. गद्दार आमदारांची जो कुणी पहिली गाडी फोडेल त्याला हिंगोलीचं शिवसेना जिल्हाप्रमुखपद दिलं जाईल असं विधान शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा रोख हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्याकडे होता. त्यातच, मंगळवारी रात्री पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर, चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बबन थोरात यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय म्हणाले होते थोरात
शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच तुम्ही फोडा, तुमचा 'मातोश्री'वर सन्मान करण्यात येईल, असे बबन थोरात यांनी म्हटलं होतं. हिंगोली शहरातील महावीर भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात थोरात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हे शिंदे गटात गेल्याने हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवा शिलेदार देणार आहेत. या पदासाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत आणि याच इच्छुकांना बबनराव थोरात यांनी आवाहन केलं आहे.