Shivsena: '15 वर्षे खासदार, शिवसेनेसाठी जिल्ह्यात भांडलो; पण एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:07 PM2022-07-19T13:07:18+5:302022-07-19T13:09:15+5:30
शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे
पुणे - शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता खऱ्या अर्थाने सत्तेत आलो आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली होती. त्यानंतर, पाटील यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, गेल्या 15 वर्षे मी खासदार राहिलो आणि केवळ एका फेसबुक पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं दु:ख त्यांनी बोलून दाखवलं.
शिवसेनेकडून तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यानंतर आढळराव पाटील यांनी समाज माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, काही वेळेतच नजरचुकीने हा प्रकार झाल्याचे सांगून शिवसेनेने कारवाई मागे घेतली होती. तेव्हापासून आढळराव पाटील नाराज होते. ते शिवसेनेत थांबणार की शिंदे गटात जाणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी शिंदेगटात प्रवेश केला.
शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उद्या मंगळवार १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिवनेरी निवास, लांडेवाडी, तालुका-आंबेगाव येथे माझ्या व शिवसेना जिल्हाप्रमुख जुन्नर विधानसभेचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याचे मेसेजही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मनातील खदखद व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंना आमच्या अडचणी माहिती होत्या, निवडून येताना काय समस्या येतात याची जाणीव त्यांना आहे. मात्र, गेल्या 15 वर्षे या जिल्हयात मी खासदार होतो, मी शिवसेना जिल्ह्यातील गावाखेड्यात नेली वाढवली, येथील शिवसैनिकासाठी मी भांडतोय. पण, एका पोस्टमुळे माझी पक्षातून हकालपट्टी केली, याची वेदना आढळराव पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच, दुसऱ्या दिवशी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला. त्यांनी तुम्ही परत या, असं सांगितल्याचंही ते म्हणाले.