पुण्यात उद्धव ठाकरे गटाला धक्का! जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 10:52 AM2023-05-17T10:52:50+5:302023-05-17T10:54:40+5:30
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला....
केडगाव (पुणे) : दौंड तालुक्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नव्हती. याउलट ठाकरे गटाचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी वरवंड येथे राष्ट्रवादीसाठी सभा घेतली.
ती सभा तूर्तास रद्द करावी, बाजार समिती निवडणुक झाल्यानंतर सभा घ्यावी अशी मागणी महेश पासलकर यांनी संजय राऊत यांच्याकडे केली होती. तरीसुद्धा पासलकर यांचा विरोध झुगारून संजय राऊत यांनी वरवंड येथे दौंड बाजार समितीसाठी सभा घेतली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून महेश पासलकर नाराज होते. आज अखेर या नाराजीचे रूपांतर पक्षांतरामध्ये झाले अशी चर्चा परिसरात रंगली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खच्चीकरण करून काँग्रेस व राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असे महेश पासलकर यांनी म्हटले आहे