काळूसमध्ये शिवसेनेच्या सभेत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गोंधळ
By Admin | Published: October 11, 2014 06:49 AM2014-10-11T06:49:43+5:302014-10-11T06:49:43+5:30
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशगोरे यांच्या काळूस (ता. खेड) येथील सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
चाकण: खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुरेशगोरे यांच्या काळूस (ता. खेड) येथील सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
कोपरा सभा सुरु असताना आलेल्या तीस ते पस्तीस जणांच्या जमावाने गोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना मारहाण करण्याचा
प्रयत्न झाल्याचेही तक्रार करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते यांच्यासह १८ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे यांची सभा सुरु असताना डॉ.शैलेश मोहिते व नीलेश जेधे यांच्यासह सुमारे तीस ते पस्तीस जणांचा जमाव शिवागाळ करीत उमेदवार सुरेश गोरे यांच्या दिशेने चालून आला.
कार्यकर्त्यांनी गोरे यांना घोळक्यात घेऊन त्यांच्या वाहनापर्यंत नेले. मात्र, आक्रमक कार्यकर्ते गोरे यांचा पाठलाग करीत वाहनापर्यंत आले असता महिलांनी गोरे यांच्या वाहनाला कडे केले. त्यानंतर सभेला आलेल्या नागरिकांनी वाट दिसेल तेथून पळ काढला. या घटनेनंतर उमेदवार गोरे , शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि मारहाण झालेल्या महिला यांनी चाकण पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. शिवसेनेच्या विजया शिंदे यांनी सांगितले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्या यशोदा जगताप, शशिकला घोडके यांच्यासह पाच महिलांना मारहाण झाली आहे.
यावेळी पोलीस ठाण्यात खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेश जवळेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे, उपजिल्हाप्रमख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख अॅड.गणेश सांडभोर, विजया शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
डॉ. शैलेश मोहिते , शरद मोहिते ,धैयशील पानसरे, सुखदेव पानसरे, निलेश जेधे यांच्यासह अठरा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.
दरम्यान, सभेत गोंधळ घालण्याचा प्रकार हा शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्त्यांचा पूर्वनियोजित बनाव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे डॉ. शैलेश मोहिते
यांनी दिली. ते म्हणाले, गोरे यांच्या गाडीतल काही जणांना आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. त्यांच्यातील काही महिलांनी कपडे फाडून बनाव केला. (वार्ताहर)