शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 07:56 PM2019-01-30T19:56:06+5:302019-01-30T19:58:19+5:30
लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा शिवसेनेचा विचार आहे.
पुणे : लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी भारतीय जनता पाटीर्ला अल्टीमेटम दिला असला तरी त्यांच्या पुण्यातील शिलेदारांना मात्र लोकसभेसाठी भाजपाबरोबर युती हवी आहे. लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा त्यांचा विचार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती होती. विधानसभेला मात्र युती तुटली व दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. शिवसेनेने सर्व ्म्हणजे आठही लोकसभा मतदारसंघ लढवले, मात्र सर्व ठिकाणी त्यांचा पराभव झाला व भाजपाने सर्वच मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. त्यानंतर राज्यातील, महापालिकेतील सत्ताही मिळवली. त्यामुळे शिवसेनेत भाजपाविषयी गेली साडेचार वर्षे कडवेपणाच आहे. मात्र आता लोकसभेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर राजकीय दृष्टिने याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे युती फायदेशीर ठरेल असा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा होरा आहे. त्यातूनच भाजपाच्या विरोधातील त्यांची टिकेची धार गेल्या काही महिन्यांमध्ये एकदम कमी झाली आहे.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर यांच्याकडे पक्षप्रमुखांनी शहराची जबाबदारी दिली. त्याआधी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या व आमदाकरी मिळवलेल्या विनायक निम्हण यांना ते सेनेत परतल्यानंतर शहरप्रमुख करण्यात आले होते, मात्र वर्षभरानंतरच त्यांनी राजकारणातील रस काढून घेतला असून शहरप्रमुखपदही सोडले. ते मिळाल्यानंतर सुरूवातीच्या काळात मोकाटे व बाबर यांनी आंदोलने करून मरगळ घालवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेही आता राजकीय विचार करून शांत बसले असल्याचे दिसते आहे. महापालिकेतील शिवसेनेचाही भाजपा विरोध कमी झाला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत सर्वच पुण्यातील सर्वच मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाला असला तरी पर्वती, हडपसर, कोथरूड, कॅन्टोन्मेंट या मतदारसंघात ते दुसऱ्या क्रमाकांवर होते. पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सहा विधानसभा मतदारसंघात मिळून शिवसेनेची साधारण २ लाख मते आहेत. त्याचाच फायदा राजकीय वाटाघाटींसाठी होईल असे शिवसेनेच्या बºयाच पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
लोकसभेची जागा भाजपाकडे आहे, सव्वातीन लाख मतांच्या फरकाने त्यांनी ती जिंंकली आहे, मात्र तरीही आता ते वर्चस्व कमी झाले आहे. जागा राहिल की नाही अशी खात्री त्यांना देता येत नाही. त्यामुळेच शिवसेनेने लोकसभेला त्यांना मदत करत दोन लाख मतांचा दाखला दिला तर त्यांना फायदा होऊ शकतो. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लोकसभेतील मदतीच्या बळावर विधानसभा मतदारसंघाची मागणी करता येऊ शकते असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवलेल्या विधानसभा मतदारसंघांचा दावा करणे शक्य होईल असे त्यांना वाटते.
सर्व विधानसभा मतदार संघात त्यांचेच आमदार असले तरी त्यांच्याच सर्व्हेक्षणानुसार त्यापैकी काहीजण डेंजर झोनमध्ये आहेत. ते मतदारसंघ मागता येऊ शकतात. पालकमंत्री गिरीश बापट लोकसभा लढवण्याच्या विचारात आहेत. तसे झाले तर त्यांचा कसबा विधानसभा मतदारसंघ मागता येऊ शकतो. त्या दृष्टिनेच युती व्हावी असे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.