दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात शिवशाही बसची दुभाजकला धडक; नारायणगाव बाह्यवळण मार्गावरील अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:07 PM2023-08-18T17:07:59+5:302023-08-18T17:19:24+5:30
या अपघातात ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले...
नारायणगाव (पुणे) : नारायणगाव बाह्यवळणाच्या खोडदरोड चौकात दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही बस विरुद्ध दिशेने जाऊन दुभाजकाला धडकली. या अपघातात ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. १८) रोजी सकाळी ८ वाजता झाला.
दरम्यान, शिवशाही बसचा (एम. एच. ०६ एस ९४२० ) हायड्रोलिक दरवाजा लॉक झाल्याने बसची पुढची काच फोडून सुमारे ५० प्रवाशांना पिकअप टेम्पोच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. खोडद चौकात सातत्याने अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी हिवरे येथील एक महिला अपघातात मृत्युमुखी झाली होती. खोडदला जाण्यासाठी भुयारी मार्ग रस्ता मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात काम कधी सुरु होणार असा सवाल खोडद , हिवरे गावचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी केला आहे.
पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगाव बाह्यवळण रस्त्यावरील खोडदरोड चौकात दुचाकीस्वार साई सोपान पाटे (वय १९, राहणार, नारायणगाव) हा युवक खोडदच्या दिशेने जात होता. त्यावेळी पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही बसच्या चालकाने दुचाकीस्वार साई पाटे याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने शिवशाही बस दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामध्ये बसमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
अपघात झाल्यावर नारायणगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमींना बाहेर काढले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुचाकीस्वार साई पाटे हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.