‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 08:38 PM2018-06-18T20:38:05+5:302018-06-18T20:38:05+5:30

कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो. 

'Shivshahi' bus ticket rate create cash problem for passenger | ‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड

‘शिवशाही’च्या हट्टापायी प्रवाशांना भुर्दंड

Next
ठळक मुद्देसाध्या बसलाही प्राधान्य देण्याची मागणीखासगी वाहनचालक १५० रुपये आकारून प्रवासी वाहतूक करतात

बारामती : एसटी प्रशासनाच्या शिवशाही प्रेमापोटी प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बारामती बसस्थानकातून स्वारगेटसाठी शिवशाही बसलाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. या वातानुकूलित बसचे तिकीट २00 रुपये झाल्याने अनेक प्रवासी साध्या बसला पसंती देत आहेत. पण प्रशासनाच्या शिवशाही हट्टामुळे प्रवाशांची एकप्रकारे लूट होत आहे.
बारामती-पुणे विनाथांबा बससेवेला बारामती परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे नोकरी व कामानिमित्त दररोज प्रवास करणारे प्रवासी बारामती येथून दररोज ये-जा करीत असतात. बारामती आगारातील विनाथांबा बससेवेचा इंदापूर, बारामती, अकलूज व परिसरातील ग्रामीण भागातून दररोज हजारो प्रवासी असतात. 
मागील महिन्यात बारामती-पुणे विनाथांबा सेवेमध्ये वातानुकूलित शिवशाही बसचे आगमन झाले. बारामती परिसरातून पुणे येथे जाण्यासाठी प्रवासीवर्ग विनाथांबा सेवेला पसंती देत असतो. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विद्यार्थी, नोकरदार व सर्वसामान्य प्रवासीवर्ग पुणे येथे जाण्यासाठी शिवशाही, निमआराम बसऐवजी साध्या बसला पसंती देत असतो. मात्र बारामती बसस्थानकातून स्वारगेट येथे जाण्यासाठी लागोपाठ शिवशाही बस सोडण्यात येत असल्याची तक्रार ‘लोकमत’शी बोलताना प्रवासीवर्गाने केली. दोन-दोन तास साध्या बसची प्रतीक्षा करावी लागते. मात्र कामे वेळेत उरकण्यासाठी नाईलाजास्तव २०० रुपयांचा भुर्दंड सहन करून प्रवाशांना शिवशाहीने प्रवास करावा लागतो. 
काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने एसटीची भाडेवाढ केली. या भाडेवाढीचा परिणाम थेट प्रवासीवर्गावर झाला आहे. बारामती-पुणे मार्गावर शिवशाहीचा असणारा १७१ रुपये तिकीटदर २०० रुपयांवर गेला. तर निमआराम बसचा तिकीटदर १५६ रुपयांवरून १९२ रुपयांवर गेला आहे. शिवशाही व निमआराम बसच्या तिकीटदरामध्ये फक्त ८ रुपयांचाच फरक राहिला आहे. बारामती-पुणे मार्गावर सर्वसामान्य प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार आदींची संख्या जास्त असते.  लागोपाठ शिवशाही किंवा निमआराम बस लागल्यास प्रवासीवर्गाच्या खिशाला झळ बसते. त्यामुळे सर्व प्रवासीवर्ग साध्या बसला पसंती देत असतो. साध्या बसची भाडेवाढ १११ रूपयांवरून १३५ रूपयांवर गेली आहे. परिणाम शिवशाही बस सलग न लावता, एका शिवशाही व एक साधी बस अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. 
बारामती आगारातून पुणे विनाथांबासाठी जाणाऱ्या -येणाऱ्या मिळून  १० शिवशाही बसच्या एकूण ५२ फेऱ्या होतात. तर साध्या बसच्या ६४ फेऱ्या तर निमआराम बसच्या १४ फेऱ्या होतात, अशी माहिती वरिष्ठ आगारप्रमुख अमोल गोंजारी यांनी दिली. 
लागोपाठ शिवशाही व निमआराम बस लागल्यावर प्रवासी जादा तिकीट दरामुळे या बसने जाण्यास अनुत्सुक असतात. याचा फायदा उचलत खासगी वाहनचालक १५० रुपये आकारून प्रवासी वाहतूक करतात, असे आढळून आले. 
..........................
खिशाला झळ न बसता प्रवाशांच्या मागणीवरून शिवशाही व निमआराम बस लागोपाठ न लावता सोबत साध्या बसदेखील लावल्या जाव्यात. या पद्धतीने नियोजन केल्यास प्रवासीवर्गास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. - बाळासाहेब गावडे, जिल्हा संघटक, सचिव, महाराष्ट्र राज्य एसटी कामगारसेना

Web Title: 'Shivshahi' bus ticket rate create cash problem for passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.