पर्वतीवर शिवशाही, पेशवाईचा मिलाफ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:20 AM2018-11-01T03:20:52+5:302018-11-01T03:21:18+5:30

- प्रज्ञा केळकर-सिंग। पुणे : शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्षीदार असलेल्या पर्वतीने ऐतिहासिक अस्तित्वाच्या खुणा प्राणपणाने जपल्या आहेत. शिवरायांचा पराक्रम ...

Shivshahi on the mountain, Peshwas combination | पर्वतीवर शिवशाही, पेशवाईचा मिलाफ

पर्वतीवर शिवशाही, पेशवाईचा मिलाफ

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग।

पुणे : शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीची साक्षीदार असलेल्या पर्वतीने ऐतिहासिक अस्तित्वाच्या खुणा प्राणपणाने जपल्या आहेत. शिवरायांचा पराक्रम आणि पेशवाईचा कालखंड यांच्या पाऊलखुणा जपल्याशिवाय पुण्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही. हाच इतिहास पर्वतीवर शिल्पमालिकेच्या स्वरूपात लवकरच साकारला जाणार आहे. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची प्रतिकृती आणि पेशवाईची समग्र माहिती देणारी भित्तीशिल्पे पर्वतीच्या समृद्धीमध्ये भर घालणार आहेत. पुढील महिन्याभरात काम पूर्ण होऊन पर्यटक, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना हा इतिहास अनुभवायला मिळेल. विपुल खटावकर यांनी ही भित्तीशिल्पे साकारली आहेत, तर अभिजित धोंडफळे यांनी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

नगरसेविका आश्विनी कदम यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प हाती घेण्यात आला. गडकिल्ल्यांची प्रतिकृती आणि पेशव्यांच्या इतिहासावर आधारित भित्तीशिल्पांसाठी सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पर्वतीच्या दहा-बारा पायºया चढून गेल्यानंतर डाव्या बाजूला असणाºया जागेमध्ये ही शिल्पमालिका उभारणार आहे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. पुण्याच्या ऐतिहासिक वारशामध्ये पर्वतीचे मोलाचे स्थान आहे. त्यामुळेच पर्वतीला भेट देणाºया पर्यटकांना शिल्पमालिका पर्वणी ठरणार आहे. भावी पिढीला यातून इतिहास जाणून घेण्यास मदत होईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे या प्रकल्पासाठी मार्गदर्शन लाभले.

शिवमुद्रांचा अभिषेक, शाहूमहाराज आणि राजमाता भेट
घोड्यावर स्वार झालेले श्रीमंत बाजीराव पेशवे, बुंदेलखंडची लढाई, पेशवा बाजीराव यांच्या मातोश्री काशीबाई यांची काशीयात्रा, राम शास्त्री प्रभुणे यांची न्याय नि:स्पृहता, चिमाजी अप्पा यांची वसई किल्ला लढाई, पालखेडची लढाई, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्यातील प्रसंग, शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंत पिंगळे यांनी केलेला शिवमुद्रांचा अभिषेक, शाहूमहाराज आणि राजमाता भेट, अटकेपार झेंडे, शिवराय आणि अष्टप्रधान मंडळ आदी प्रसंगांची भित्तीशिल्पे शिल्पकार विवेक खटावकर यांचे चिरंजीव विपूल खटावकर यांनी साकारली आहेत.

गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पन्हाळा, सिंहगड, पुरंदर, लोहगड आणि राजमाची आदी किल्ल्यांचा समावेश आहे. या प्रतिकृती आणि भित्तीशिल्पांना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच विस्तृत माहितीची फलकही दर्शनी भागात लावले जाणार आहेत. भावी पिढीला इतिहासामध्ये अभिरूची निर्माण व्हावी आणि त्यांना सोप्या पद्धतीने इतिहास जाणून घेता यावा, हा यामागचा उद्देश आहे.

पुण्याचा इतिहास शिवाजीमहाराजांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर पर्वतीची जडणघडण पेशव्यांनी केली. पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थ्यांना इतिहासाचा हा मिलाफ अनुभवता यावा, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला. मी स्थायी समिती अध्यक्षा असताना वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पमालिकेचा प्रकल्प मंजूर झाला. यातून विद्यार्थ्यांना शिवाजीमहाराजांचा पराक्रम आणि पेशवाईचा इतिहास जाणून घेता येईल. सुमारे दीड कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढील महिन्याभरात पूर्णत्वाला जाईल, अशी आशा आहे.
- अश्विनी कदम, नगरसेविका

सुमारे सहा महिन्यांपासून भित्तीशिल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. ही म्युरल्स साधारणपणे ८ फूट रुंद आणि ६ फूट उंच आहेत. एखादे पॅनेल १० फूट उंचीचे आहे. फायबर ग्लासपासून म्युरल्स तयार करण्यात आली आहेत. पेशवाईतील विविध प्रसंग भित्तीशिल्पांमधून साकारण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासतज्ज्ञांच्या मदतीने हे प्रसंग निवडण्यात आले. यामध्ये सुमारे १३ ते १४ प्रसंग साकारले आहेत.
- विपूल खटावकर

Web Title: Shivshahi on the mountain, Peshwas combination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.