बारामती मार्गावर आजपासून शिवशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:59 AM2018-04-28T06:59:36+5:302018-04-28T06:59:36+5:30
विनावाहक सेवा : स्वारगेटपासून दर अर्ध्या तासाला बस
पुणे : प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेली वातानुकूलित शिवशाही बससेवा शनिवारपासून बारामती मार्गावर सुरू केली जाणार आहे. दर अर्ध्या तासाला स्वारगेट येथून ही
बस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. बारामती-पुणे-बारामती मार्गावर सध्या साध्या बसमार्फत विनावाहक-विनाथांबा ही सेवा पुरविली जात आहे. सध्या दर पंधरा मिनिटाला स्वारगेट व बारामती येथून बस उपलब्ध होते. ही बससेवा सुरू झाल्यापासून या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अधिक उत्पन्न मिळवून देणारा हा मार्ग आहे. एसटीच्या ताफ्यात शिवशाही बस दाखल झाल्यानंतर बारामती मार्गावरही ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. उन्हाळ्यामुळे ही मागणी वाढली होती. तसेच सध्या शिवशाही सुरू असलेल्या सर्वच मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने बारामती मार्गावरही वातानुकूलित शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारपासून (दि. २८) सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत विनावाहक-विनाथांबा सेवा सुरू केली जाईल. तर अर्ध्या तासाला या बस सोडण्यात येणार असून, दिवसभरात शिवशाहीच्या २६ फेऱ्या होतील. या बसला प्रौढ प्रवाशांसाठी १६१ रुपये, तर लहान मुलांसाठी ८२ रुपये तिकीटभाडे आकारण्यात येईल. या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.