बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवला: हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:26 PM2021-11-15T18:26:43+5:302021-11-15T18:29:21+5:30
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले
बारामती (पुणे): शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare) यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
व्याख्याने, नाटक आणि लिखाणाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचे मोठे कार्य इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले असल्याची प्रतिक्रिया यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. थोर इतिहास संशोधकास श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.
मागील आठवड्यात बाबासाहेब पुरंदरे यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी (सोमवारी) बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. पंतप्रधान नरेद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सचिन तेंडूलकर, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.
जाणता राजा महानाट्याचे निर्माते
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.