शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 07:25 AM2021-11-15T07:25:54+5:302021-11-15T09:35:11+5:30

त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे. 

Shivshahir Babasaheb Purandare passed away in the morning, letter issue by hopital in pune | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश; ९९व्या वर्षी प्राणज्योत मालवली

googlenewsNext

मुंबई - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.07 मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

‘शिवशाहीर’ हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते अटकर कोट-जाकिटातले, हिमसफेद दाढी आणि मानेवर रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र जटा सांभाळत हजारोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे. ‘शिवाजी महाराज’ हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहिरांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या साह्याने ‘वन्ही तो चेतवावा। चेतविता चेततो।’ या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली.

बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

जाणता राजा महानाट्याचे निर्माते

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.

बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले आणि त्यातून ऐतिहासिक जाणिवांनी बहरलेले राष्ट्रभक्तीचे मळे उभे राहिले. त्यांच्या प्रेरणेने असंख्य शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांनी दिली. अभ्यासक, संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होते. सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी विमानाने, कधी बैलगाडीपासून ते घोडेस्वारीपर्यंत मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला.

असा घडलं शिवचरित्र

रात्ररात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी जवळ पैसे नव्हते.  मग, पैसे जमवायला बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीरही विकली. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे कौतुक करताना आचार्य अत्रेंनी ‘मराठा’तल्या अग्रलेखात लिहिले, “हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके सुंदर झाले आहे.

शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान झाले ते नागपूरला. २५ डिसेंबर १९५४. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला शंभर एक लोक उपस्थित होते. पुढे शिवचरित्रकथन हा त्यांचा ध्यास घेऊन ते जगभर फिरले. आज वयाची ९९ वर्षे  पार झाली, तरी बाबासाहेबांची शिवशाहिरी त्याच जोमात सुरू होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले होते की, “बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावे तर तिचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेले आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे.

Web Title: Shivshahir Babasaheb Purandare passed away in the morning, letter issue by hopital in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.