शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे १०० व्या वर्षात पदार्पण; पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:47 AM2021-07-29T10:47:28+5:302021-07-29T11:07:58+5:30
राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची भेट घेतली.
पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आजच १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्रासहित पुण्यातही त्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुण्यातल्या बाबासाहेबांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला आहे.
शहारत अनेक शिवप्रेमींनी बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य शिबिरांचे आयोजनही केले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात २० बाय १५ फूटी रांगोळी साकारण्यात आली आहे. तसेच ९९ दिवे प्रज्वलित देखील करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि इतिहास प्रेमी मंडळामार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १०० व्या वर्षात पदार्पण; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार.#Babasahebpurandare#RajThackeray#punepic.twitter.com/FqE1lLJass
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2021
बाबासाहेब पुरंदरे यांचं मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं आहे. पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळासोबत त्यांनी इतिहास संशोधक म्हणून काम सुरु केलं. २०१५ सालापर्यंत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.
जाणता राजा महानाट्याचे निर्माते
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यांना २०१५ साली महाराष्ट्रभूषण तर २०१९ साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागतात.