पंतप्रधानांच्या भेटीसाठी शिवशाहीर दिल्लीत, लाल किल्ल्यावर ‘जाणता राजा’चा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:59 AM2018-03-08T03:59:52+5:302018-03-08T03:59:52+5:30
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या देदीप्यमान शौर्याचा अभिमान जागृत करणारे स्वराज्यनिर्मितीच्या धगधगत्या संघर्षाचे महानाट्य म्हणजे ‘जाणता राजा’. या महानाट्याचा प्रयोग येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान लाल किल्ल्यावर रंगणार आहे. या महानाट्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.
पुणे - छत्रपती शिवाजीमहाराजांच्या देदीप्यमान शौर्याचा अभिमान जागृत करणारे स्वराज्यनिर्मितीच्या धगधगत्या संघर्षाचे महानाट्य म्हणजे ‘जाणता राजा’. या महानाट्याचा प्रयोग येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान लाल किल्ल्यावर रंगणार आहे. या महानाट्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे पंतप्रधानांना लवकरच भेटणार आहेत.
‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि शिवचरित्राचे प्रदर्शन दिल्लीमध्ये करण्यासंदर्भात आॅगस्ट २०१७मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
स्वत: मोदी यांनी ट्विटरवरून या भेटीची छायाचित्रे शेअर केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र आणि शिवाजीमहाराजांसाठी आपले जीवन समर्पित केले आहे. वयाच्या ९६व्या वर्षीही ते शिवचरित्राच्या प्रसारासाठी कार्य करीत आहेत. भेटीची छायाचित्रे शेअर करताना मोदी यांनी पुरंदरेंच्या कार्याची प्रशंसा केली होती. ‘मी अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. तसेच त्यांचा आदर करतो,’ असेही मोदींनी म्हटले होते. या भेटीदरम्यान पुरंदरे यांनी पंतप्रधान मोदी यांना मराठा सरदार वापरत तशी जरीची पगडी आणि उपरणे देऊन त्यांचा सन्मान केला. बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजीमहाराजांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत, असे उद्गार मोदी यांनी काढले होते.
दिल्ली येथे होणाºया या महानाट्य आणि शिवचरित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे, अशी बाबासाहेबांची इच्छा आहे. यंदाच्या वर्षी ९ ते १५ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीमध्ये हे महानाट्य आयोजित करण्यात आले होते. मात्र, लाल किल्ल्यावर हा नाट्यप्रयोग होणार असल्यामुळे परवानग्या मिळण्यास विलंब लागल्याने ते पुढे ढकलण्यात आले.
येत्या ६ ते १० एप्रिलदरम्यान ‘जाणता राजा’चा प्रयोग लाल किल्ल्यावर होणार आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब पुरंदरे दिल्लीला गेले आहेत. मात्र, मोदी व्यस्त असल्याने त्यांची अद्याप मोदींशी भेट होऊ शकलेली नाही.
जाणता राजा’ महानाट्याचे उद्घाटन करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यासाठी दिल्लीला आलो आहे. मात्र, मोदी नियोजित कार्यक्रमांमुळे खूप व्यस्त आहेत. त्यांच्या पीएकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे; मात्र अद्याप ती मिळालेली नाही. शुक्रवारी (दि. ९ मार्च) मोदी यांना कुठे आणि किती वाजता भेटायचे, हे कळणार आहे.
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,
ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ