महाशिवरात्रीनिमित्त शिवशंभोचा गजर
By admin | Published: February 25, 2017 02:38 AM2017-02-25T02:38:56+5:302017-02-25T02:38:56+5:30
शहरातील मृत्युंजयेश्वर, ओंकारेश्वर, पाताळेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त आज दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या
पुणे : शहरातील मृत्युंजयेश्वर, ओंकारेश्वर, पाताळेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त आज दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. लघुरुद्र, महारुद्र, निषिद्धकालपूजा अशा विविध धार्मिक विधींनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली.
देवदेवेश्वर संस्थानाच्या मृत्युंजयेश्वर मंदिरात सकाळी १० वाजता लघुरुद्र पूजा करण्यात आली. आदल्या दिवशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे डॉ. श्रीनंद बापट यांचे ‘शिवतांडवस्तोत्र’ या विषयावर व्याख्यान झाले. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री १२.३० वाजता निषिद्धकालपूजा पार पडली, अशी माहिती प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी दिली.
ओंकारेश्वर मंदिरामध्ये गुरुवारी महारुद्र करण्यात आला. त्याची पूर्णाहुती शुक्रवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते झाली. पहाटेपासून भाविकांचे अभिषेक सुरू होते. दिवसभरात जवळपास २५ हजार भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रात्री ८ वाजता आरती झाली. मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या यामपूजेने महाशिवरात्र उत्सवाची सांगता झाली.
भरत मित्र मंडळाने तलावातून शिवलिंग प्रगट होत असल्याचा हलता देखावा तयार केला. फरासखान्याजवळील आदर्श मंडळातर्फे २,१०० किलो बर्फाचा वापर करून शिवलिंग साकारण्यात आले होते. सायंकाळी आरती आणि प्रसादवाटप करण्यात आले. पाषाण येथील सोमेश्वर व जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर मंदिरातही भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.