शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:47 AM2018-03-16T00:47:20+5:302018-03-16T00:47:20+5:30

भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते

Shivsinhra's thoughts need a community | शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

शिवशंभूंच्या विचारांची समाजाला गरज

googlenewsNext

कोरेगाव भीमा : भारतात सर्व समाज एकत्र ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. जयंती पुण्यतिथी नावापुरती साजरी न करता शिवशंभू छत्रपतींचा विचार दैनंदिन जीवनात अंगिकारला तरच खऱ्या अर्थाने शिवशंभूना मानवंदना ठरू शकते त्याचवेळी महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवरायांप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही योगदान मोठे आहे, हेही सर्व समाजांनी विसरता कामा नये, असे पुणे ग्रामीण अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले
छत्रपती संभाजीमहाराजांचा ३२९ वा बलिदानस्मरण दिन १७ मार्च रोजी श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे होणार आहे. १ जानेवारी कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभूमिवर परिसरात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली सणसवाडी, वढू बुद्रुक व कोरेगाव भीमा येथे सर्व समाजातील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले , प्रांताधिकारी भाऊ गलंडे, शिरूर तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, तिन्ही गावाचे दोन्ही समाजाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी सांगितले की , ‘१ जानेवारी दंगलीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक हानी झाली आहे. शासन नुकसान भरपाई देईल. मात्र मनामध्ये निर्माण झालेली पोकळी दोन महिन्यांनंतरही भरू शकली नाही. जोपर्यंत ही मनातील पोकळी भरू शकत नाही, तोपर्यंत शांतता प्रस्थापित होणार नाही, यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी व वयोवृद्ध नागरिकांनी पुढाकार घेऊन तरुणांना विश्वासात घेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी प्रशासन व नागरिक एकाच
नाण्याच्या दोन बाजू आहेत. गावामध्ये सामाजिक सालोख्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी सणसवाडी येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की , ‘गावात सामाजिक सलोखा या आधीही प्रस्थापित असून यापुढेही अबाधित राहील, अशी ग्वाही यावेळी दिली तर गावातील तरुणांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असल्याने तरुण मानसिकरित्या तणावाखाली राहत असल्याने पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली. वढू बुद्रुक येथील बैठकीत वढू-चौफुला व वढू-कोरेगाव भीमा रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी करतानाच दिशादर्शक फलक लावण्याचीही मागणी यावेळी केली. गेली ४ वर्षापासून शासकीय मानवंदना देण्यात येत असुन यापुढेही शासकीय मानवंदना देण्यात यावी अशी सूचना यावेळी केली.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या बैठकीत नागरिकांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळण्याची मागणी करतानाच १ जानेवारी रोजी स्वरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारातून स्थानिकांवर झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
>मोबाइल मेसेजेसमुळे वितुष्ट
मोबाइलवर आलेल्या मेसेज समाजविघातक असलेतरी ते अनेकांना पाठविण्याची स्पर्धाच तरुणांमध्ये लागल्याने समाजात वितुष्ट निर्माण होऊ लागले आहे. यासाठी तरुणांनी आपल्या मोबाइलचा योग्य वापर करणे गरजेचे आहे; नाहीतर विघातक संदेश पसरविणारांवर कारवाई होणारच असल्याचे सुवेझ हक यांनी सांगितले.
>बेकायदा फ्लेक्स काढण्यासाठी मदत
विनापरवाना लावलेले फ्लेक्स काढण्यासाठी पोलीस बळ देऊन त्याचवेळी फ्लेक्स लावण्यासाठी ग्रामपंचायतीची सशुल्क परवानगी गरजेची असून तो फ्लेक्स काढण्याची व त्याची संरक्षणाची जबाबदारी फ्लेक्स लावणारावरच असेल त्याचप्रमाणे गावातील पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही पुतळा बसवणारांचीच असेल, असेही सुवेझ हक यांनी सांगितले.

Web Title: Shivsinhra's thoughts need a community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.