“१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं; अन् अचानक बाळासाहेब म्हणाले.."; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' रंजक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 05:19 PM2021-09-04T17:19:55+5:302021-09-04T17:37:42+5:30
मी माझ्या शालेय जीवनात कधीही वक्तृत्व स्पर्धेत भाग नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न मला पडायचा.
पुणे : १९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं. बाळासाहेबांच्या शेजारीच मी बसलो होतो. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळी सुद्धा हजर होते. अचानक बाळासाहेब मला म्हणाले, तू बोलणार आहेस ना. मी म्हटलं, तू काहीतरी बोलू नकोस हा…. नाही तर मी येथून निघून जाईल. त्यावर बाळासाहेब म्हणाले, नाही नाही, तू आज बोललंच पाहिजे. हे सर्व आम्हा दोघांचं सुरू होतं.. आणि एकदम बाळासाहेब म्हणाले, तू बोलतोयस की मी जाऊन जाहीर करू.. अशाप्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा रंजक किस्सा सांगितला.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे शनिवारी (दि. ४) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसेच्या वतीने आयोजित ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त शिवशाहीर करंडक स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
राज ठाकरे म्हणाले, इतक्या लोकांसमोर माझ्या आयुष्यातील पहिले भाषण मी शिवतीर्थावर दिले. तोपर्यंत माझी पुढे जाऊन बोलायची हिंमत होत नव्हती. मी कधी बोलू शकेल आणि भाषण करू शकेल. यावर देखील माझा कधीच विश्वास नव्हता.
आजपर्यंत मी अनेक वक्ते ऐकले आहेत. आमच्या घरात तर माननीय बाळासाहेब होतेच. शिवाय श्रीपाद अमृत डांगे, जॉर्ज फर्नाडिस, अटलबिहारी वाजपेयीजी यांसारख्या अनेक वक्त्यांना मी अगदी जवळून पाहिले व ऐकले सुद्धा आहेत.,मात्र हे लहानपणापासून जरी अनेक दिग्ग्ज वक्त्यांना मी पाहत आलो असलो तरी आयुष्यात कधी बोलेल, असं कधीच वाटलं नव्हतं असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हटल्यानंतर शिवराय ही गोष्ट आलीच. त्याच अनुषंगाने शिवराय यांच्यावर दोन विषय घेऊन ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धेतून वक्ते तयार होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आता मी चार-पाच जणांची भाषणं ऐकली. त्या सर्वांचा मला हेवाच वाटतो. मी माझ्या शालेय जीवनात कधी वक्तृत्व स्पर्धेत कधी भागच नाही घेतला. बोलायला भीती वाटायची. लोकांसमोर जायचं कसं, बोलायचं कसं असा प्रश्न पडायचा. तसेच जे बोलतात. त्यांच्याबद्दल मला नेहमी कुतहूल वाटायचं, असेही ते म्हणाले.
याचवेळी.दुपारचे दोन वाजले आहेत. सकाळपासून ही वक्तृत्व स्पर्धा सुरू आहे.त्यामुळे अनेकांच्या पोटात बहुदा वक्तृत्व वक्तृत्व असे आवाज येत असतील अशा शब्दात ठाकरे यांनी मिश्किल टिपण्णी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.