वीजचोरांना दिला ‘शॉक’

By admin | Published: May 6, 2015 06:06 AM2015-05-06T06:06:26+5:302015-05-06T06:06:26+5:30

रमाईनगर, भाटनगर, निराधारनगर, लिंक रस्ता येथील अनधिकृत वीजजोडणी तोडून महावितरणने संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Shock | वीजचोरांना दिला ‘शॉक’

वीजचोरांना दिला ‘शॉक’

Next

महावितरण : अनधिकृत वीज वापरणाऱ्या ४५० जणांवर कारवाई

पिंपरी : रमाईनगर, भाटनगर, निराधारनगर, लिंक रस्ता येथील अनधिकृत वीजजोडणी तोडून महावितरणने संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. एकट्या रमाईनगरमध्ये चारशे अनधिकृत आकडे टाकून वीज वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महावितरणकडून सकाळी १०.३० वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
या कारवाईसाठी गेल्यानंतर विरोध होऊ नये, म्हणून महावितरणने मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह दोन पोलीस उपनिरीक्षक व ५० कर्मचारी उपस्थित होते. महावितरणचे ६० कर्मचारी कारवाई करण्यासाठी उपस्थित होते. रमाईनगरमध्ये होत असलेल्या कारवाईला विरोध वाढत गेल्याने अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला.
दिवसभर महावितरणने कारवाई केली. अनधिकृत वीजजोडणी केलेले केबलही त्यांनी तोडले. ते संपूर्ण केबल महावितरणने जप्त केले. या ठिकाणी खांबावर आणि डिपीच्या बॉक्समधूनही मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीजजोडणी केली होती. ते संपूर्ण केबल महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तोडले.
संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीजजोडणी झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरामध्येच कारवाईची मोहीम टप्प्या-टप्प्याने हाती घेतली जाणार आहे. एकदा वीज तोडल्यानंतर परत दोन-तीन दिवसांत तशीच परिस्थिती होते. त्यामुळे अशा विभागावर लक्ष ठेवून तीन ते चार दिवसांनी परत कारवाई केली जाणार आहे. कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागतो. त्यामुळे कारवाईला वेळ लागत आहे.
या कारवाईवेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल बडवे, सहायक अभियंता आर. सी. पाटील, एस. एस. सुर्वे, सहायक अभियंता अनिल गौडा उपस्थित होते. (प्रतिनिधी)

त्वरित वीजमीटर देणार

शहरातील काही भागांमध्ये महावितरणने कारवाई केल्यानंतर रात्रीच्या वेळी पुन्हा अनधिकृत वीजजोड करून वीज वापरली जाते. त्यामुळे या भागामध्ये आठवड्यातून दोन-तीन वेळा पाहणी करून, अशा प्रकारची. कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वीज मीटर घेण्यासाठी पुढे यावे त्यांना त्वरित मीटर देण्यात येईल.
- धनंजय औंढेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.