उष्माघातामुळे होतोय किडनीवर आघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:41 AM2018-04-10T01:41:16+5:302018-04-10T01:41:16+5:30
यंदा मार्च महिन्यापासूनच वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा चढू लागल्याने सामान्य नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे.
प्राजक्ता पाटोळे
पुणे : यंदा मार्च महिन्यापासूनच वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढू लागले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा चढू लागल्याने सामान्य नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागत आहे. उष्माघाताचा त्रास होत असलेल्या रुग्णांमध्ये एका आठवड्यात १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा त्रास वाढल्यास थेट किडनीवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तापमान वाढत असल्याने आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन किडनीचा त्रास व उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात वाढत आहे. शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७.८ सेल्सिअस असते. उन्हाळ्यात तापमान वाढते, त्या वेळी शरीर पुन्हा तापते आणि पुन्हा ते नॉरमल आणण्यासाठी शरीराला घाम येतो, ते करणारे सेंटर मेंदूमध्ये असते. तापमानाचे नियंत्रण करणारे केंद्रबिंदू शरीरातील पाण्यावर अवलंबून असते. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होऊ लागले की, हे नियंत्रण करणारे केंद्र बिघडून शरीराचे तापमान योग्य राखले जात नाही, त्यामुळे आजार होण्यास सुरुवात होते. चक्कर येणे, मळमळ होणे, डोके दुखणे असे त्रास होण्यास सुरुवात होते. शरीरातील पाणी खूपच कमी झाल्यास नियंत्रण केंद्राचा पूर्ण ताबा नष्ट होऊन माणसाच्या मेंदूतील रस ते काम करण्यास बंद पडून उष्मघात होण्याची शक्यता असते.
उन्हाळ्यात बाहेरील तापमान ४२ सेल्सिअसहून अधिक असते. उन्हामध्ये शरीराचे तापमान ३७.७० सें. कायम ठेवतात. उष्माघात म्हणजे शरीराचे तापमान ३८.१ पेक्षा (१००-१०१) अधिक किंवा त्याहून अधिक
स्थिर राहणे.
सामान्यपणे दुपारी शरीराचे तापमान ३७.७० सें. (९७.५ ते ९८) असते. उष्माघातामध्ये हे तापमान ४० सेल्सिअस होणे हे जीव घेणे ठरते. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य थांबते आणि मृत्यू ओढवतो. बाहेरील तापमान चाळीसहून अधिक आणि शरीराचे तापमान चाळीस झाल्यास उष्माघात होतो.
उष्माघात दोन प्रकारचा होतो. एका प्रकारात बाह्य तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते. शारीरिक कष्टाची कामे करताना स्नायूंच्या चयापचयामुळे शरीर अधिक उष्णता निर्माण करते. उष्ण आणि दमट हवेत शरीर थंड ठेवण्याची यंत्रणा काम करीत नाही.
जितके वय कमी तेवढे उष्माघाताचा परिणाम तीव्र असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्यासोबत जवळ पाण्याची बाटली बाळगणे, दर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी पिणे, अधूनमधून लिंबूपाणी बर्फ न टाकलेले पिणे अशा उपायांनी उष्माघात टाळता येतो.
सुरुवातीस वाढती उष्णता तुमच्या शरीरावर झपाट्याने परिणाम करते. साधारणत: उन्हाळ्यात ४० टक्के लोकांना त्रास नक्कीच होतो. सध्या उष्णतेमुळे जास्त प्रमाणात लोकांना त्रास होत आहे. यामध्ये लहान मुलांची आणि वृद्धांची संख्या जास्त आहे. ६० टक्के बाहेर फिरणाऱ्या लोकांना उन्हाचा त्रास होतो. त्याचबरोबर उष्णतेमुळे किडनी स्टोनचे खूप पेशंट वाढले आहे. शरीराकडे दुर्र्लक्ष करणे हानिकारक ठरण्याची शक्यता आहे.
डॉ. अविनाश भोंडवे