‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक
By admin | Published: February 6, 2015 12:31 AM2015-02-06T00:31:13+5:302015-02-06T00:31:13+5:30
दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत.
धनकवडी : दत्तनगर तसेच आंबेगाव खुर्द व बुद्रुक या परिसरात छोट-मोठे व्यवसाय आहेत. अनेकांची रोजी-रोटी त्यावर अवलंबून असताना, या भागात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्यावसायिकांबरोबरच नागरिक हैराण झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. विद्युतवाहिन्या भूमिगत केल्यापासून पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांमध्ये आर्द्रता जाण्यामुळे वारंवार विद्युत ाुरवठा खंडित होतो. मात्र सध्या कोणतीच परिस्थिती नसताना देखील वीज खंडित होण्यामुळे छोटे व्यावसायिक रस्त्यावर येण्याची व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिकांकडे जनरेटरची सुविधा असल्याने काम सुरु राहते. मात्र, सध्या सुरूअसलेल्या मंदीमुळे जनरेटर चालविणेदेखील परवडत नाही. या व्यावसायिकांकडून मोठ्या कंपन्यांना वेळेवर मालाचा पुरवठा होत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच कायम व सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुणेकरांकडून जादा वीज आकार भरून देखील अशी परिस्थिती असल्याने व्यावसायिकांमध्ये महावितरणविषयी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. वीजबिलांमधून अनेक प्रकारचे कर वसूल केले जातात. मात्र, त्यामानाने सेवा मिळत नाही. एखाद्या वेळी वीजबिल भरण्यास विलंब झाल्यास रीतसर जोड बंद केला जातो. याकडे ‘महावितरण’ने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांनादेखील याबद्दल वीजजोड वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. लाच प्रकरणातून एक वर्षापूर्वी चार वरिष्ठ अधिकारी एकाच दिवशी एकाच वेळी जाळ्यात सापडले होते. तरीदेखील अद्याप कारभार सुधारला असल्याचे दिसत नाही. वीज जोडणीसाठी कार्यालयात जमा केलेली फाईल धूळ खात पडते. ‘महावितरण’ कंपनीचे अधिकारी ग्राहकांना सेवा देण्यात अकार्यक्षम असतील, तर त्यांची तत्काळ बदली करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. तातडीने दखल न घेतल्यास व्यावसायिकही आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
(वार्ताहर)
४स्थानिक महावितरण कार्यालयाकडे तक्रार करण्याविषयी सक्षम यंत्रणा नाही. टोल फ्री नंबर असूनही त्याचे नियंत्रण मुंबईवरून होत असल्याने तक्रार दाखल होत नाही. ‘महावितरण’चे अधिकारी मोबाईल उचलतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे तक्रार कोठे करायची, हा प्रश्न कायमच राहतो. तक्रारकेंद्र धनकवडीच्या कार्यालयात केल्यास या भागात तक्रार नोंदविता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही. ‘महावितरण’ने असाच शॉक ऐन दहीहंडीच्या उत्सवात दिल्याने रात्री बारा वाजता धनकवडीकरांनी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.