धक्कादायक! हुंडा न दिल्याने केला विवाहितेचा छळ, त्रासाला कंटाळून १९ वर्षीय मुलीने संपवले स्वतःचे जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 02:10 PM2021-04-27T14:10:57+5:302021-04-27T23:15:45+5:30
हुंडाबळी प्रकरणी पतीला अटक
पिंपरी: लग्नात तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, माहेरावरून मोटर सायकल घेऊन ये, अशी विवाहितेकडे मागणी केली. त्याला नकार दिल्याने विवाहितेचा छळ केला. त्यातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे १७ डिसेंबर २०२० ते २१ एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
प्रेम चंदेश्वर गिरी (वय ४२, रा. मठचिलावे, बिहार ) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या १९ वर्षीय विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा पती मनोरंजनकुमार हरेन्द्र भारती (वय २१), सासू कांतीदेवी हरेंद्र भारती (वय ३८), सासरे हरेन्द्रं भुवनेश्वर भारती (वय ४८, सर्व रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी पती मनोरंजनकुमार भारती याला पोलिसांनीअटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरी यांच्या मुलीचा मनोरंजनकुमारसोबत ७ डिसेंबर २०२० रोजी बिहार येथे विवाह झाला. लग्नानंतर पतीने पंधरा दिवसांनी पत्नीला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही. तू हुंडा म्हणून माहेरावरून मोटार सायकल घेऊन ये, असे म्हणाला. ती देत नाही म्हणून पती तिला जेवायला देत नसत, अशा प्रकारे तिला त्रास दिला. त्यामुळे तिने राहत्या घरात ओढणीच्या साह्याने छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा हुंडाबळी गेला आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे.