धक्कादायक ! ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना जडतोय अतिकामाचा आजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:39 PM2018-05-03T18:39:28+5:302018-05-03T18:39:28+5:30

काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  

Shocking ! 50% of IT workers are workaholic | धक्कादायक ! ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना जडतोय अतिकामाचा आजार 

धक्कादायक ! ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना जडतोय अतिकामाचा आजार 

Next
ठळक मुद्देभारतातील ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना अतिकामाचा आजार घरी गेल्यावरही ऑफिसचे काम सोडत नाही पिच्छा, हक्काची रजा मागताना वाटते लाज 

 

पुणे : उत्तम  नोकरी आणि आर्थिक स्थिती असूनही जर समाधान नसेल तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.  काहीसा असाच अनुभव भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी घेत आहेत. काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या क्षेत्रात मिळणारे गलेलठ्ठ पगार आणि झगमगीत कार्यालयांच्या पलीकडे जात डोळ्यात अंजन घालणारी अनेक सर्वेक्षणे समोर येत आहेत. 

       पुणे, बंगळुरू, चेन्नई, मुंबई अशा शहरात अनेक आय टी कंपन्या असून त्यात भारतातील लाखो कर्मचारी काम करतात. यातील अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय भारताबाहेरचे असून तिथे भारताबाहेरच्या कामाच्या पद्धतीने काम करावे लागते. त्यातच आय टी क्षेत्रात असणाऱ्या प्रचंड स्पर्धेचा तणाव सतत मनावर असतो. त्यामुळे घरीही अनेकजण बेचैन असतात. याचाच परिणाम म्हणून अनेक कर्मचारी सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री घरी आल्यावरही काम करतात. याची परिणीती  केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आजारात होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. भारतात ११०० कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पाहणीत ५० टक्के कर्मचारी घरी काम करत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांमध्येही वाढ होत आहे. अर्थातच त्यांच्या एकूण जीवनशैलीशी याचा थेट संबंध येत असून अनेकांना आपण अतिकाम करण्याच्या विकाराला बळी पडल्याचे लक्षातही येत नाही. 

   याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असून त्यांनी त्यांचे अनुभव लोकमतसोबत शेअर केले. पुण्यात हिंजवडीत काम करणारी युगंधरा म्हणाली की, मी अजिबात घरी जाऊन काम करत नाही. ऑफिसचे काम इथेच संपवण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र इथे मी शक्यतो इतर फोन किंवा सोशल साईट्स बघणे टाळते असे सांगितले. प्रिया हिने मात्र वेगळे मत व्यक्त केले असून एखाद्या दिवशी काम राहिले तर घरी करणे मला चुकीचे वाटत नसल्याचे सांगितले.गजानन यांनी काम संपत नसेल तर ते आठवड्याभरात पूर्ण करण्याची मुभा असते. अशावेळी घरी नेण्यापेक्षा ऑफिसमध्येच पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे सुचवले. शेवटी काम वेळेत पूर्ण करण्याची अट प्रत्येक क्षेत्रात असते आणि ते व्हायलाच हवे असेही ते म्हणाले.

वर्कोहोलिक असण्याची लक्षणे 

१) घरी आल्यावरही सारखी ऑफिसची कामे आठवणे 

२)कशातही मन न लागणे, सुट्टी घेतल्यावरही कामाचे नियोजन आठवणे 

३)ऑफिसमध्ये जेवणासाठीही न उठणे, काम करतानाच जेवणे 

४)महत्वाच्या कामासाठीही सुट्टी घेताना अपराधी भावना वाटणे 

५)कामापुढे घरची मंडळी किंवा जबाबदाऱ्या कमी महत्वाच्या वाटणे 

६)स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून काम करत राहणे

७)मजा करण्यात किंवा आनंद उपभोगण्यात कमीपणा वाटणे 

८)प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा ध्यास ठेवणे 

 

वर्कोहोलिक असण्याचे परिणाम 

१)सतत तणावात किंवा चिंतेत असणे 

२)वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होणे, कुटुंबासोबत संबंध बिघडणे 

३)आरोग्य बिघडणे, शरीर स्थूल होणे आणि त्या अनुषंगिक विकार होणे 

४)छातीत दुखणे किंवा श्वासाची लांबी कमी होणे 

 

वर्कोहोलिक स्वभावातून बाहेर येण्यासाठीचे उपाय 

१)सुट्ट्या या तुमच्यासाठीच असतात, त्या नक्की घ्या 

२)दिवसभर काम केल्यावर रात्री घरी काम नेणे टाळा 

३)घरी जाताना रस्त्यात ऑफिसचा विचार करणार नाही असा निश्चय करा 

४)तब्येत बरी नसेल तर काम थांबवून आराम करा 

५)आपण नसलो तर काम थांबणार नाही हे पक्क ध्यानात घेऊन कुटुंबासाठी, जोडीदारासाठी वेळ द्या 

६)वर्षातून कुटुंबासोबत सहली, समारंभ यात आवर्जून सहभागी व्हा 

७)ऑफिसमध्ये काही मानसिक त्रास होत असेल तर जवळचे मित्र किंवा जोडीदारासोबत आवर्जून शेअर करा. 

८)कामसू नाही स्मार्ट कर्मचारी व्हा, आठवड्यातून किमान दोन तास आपल्या छंदाकरीता द्या 

 

 

 

 


 

 

Web Title: Shocking ! 50% of IT workers are workaholic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.