धक्कादायक! कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन बलात्कार; खराडी परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 10:40 PM2021-01-02T22:40:51+5:302021-01-02T22:41:41+5:30
याच घटनेवरून अनिल देशमुख यांना लक्ष करताना भाजपाने 'गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले' अशी टीका केली होती.
पुणे : खराडी परिसरातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करणाऱ्याला विश्रांतवाडी पोलिसांनी ३६ तासांत गजाआड करण्यात यश मिळवले. खराडी येथे राहणारा हा २४ वर्षाचा तरुण आहे.
पीडित तरुणीने खराडी परिसरातील एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास ती दुचाकीवरून धानोरीला घरी निघाली होती. दरम्यान ती घरी जात असताना तिचा आरोपीने पाठलाग सुरू केला. काही वेळानंतर तिला टिंगरेनगर परिसरात अडविले. त्यानंतर तिला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसविले. तरुणीला खराडी परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी आरोपी घेऊन गेला. त्या ठिकाणी तरुणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला गुंजन चौक परिसरात आणून सोडले. आरोपीच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीने मित्राला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली .
आरोपीला फिर्यादी ओळखत नव्हती. त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे काम जिकीरीचे होते. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी संपूर्ण मार्गावरील सीसीटीव्ही तपासणीसाठी एका पथकाची नेमणूक केली. त्यातून काही ठिकाणी या तरुणीला घेऊन जाताना दिसून आला. त्यावरुन पोलिसांनी या नराधमाचा शोध घेऊन त्याला शनिवारी पहाटे अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम अधिक तपास करीत आहेत.
'गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले' ...
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिलं. "हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या. मात्र, गृहमंत्र्यांची ही कार्यतत्परता म्हणजे नौटंकी असल्याची टीका पुण्यातील भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी पुण्यातील एका तरुणीवर झालेल्या बलात्काराचा दाखला देत गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले, असेच म्हटलं.