धक्कादायक! पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात; पतीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:38 PM2021-04-14T17:38:38+5:302021-04-14T17:39:21+5:30
गर्भपातासाठी गोळ्या घेण्यास दिला होता नकार
पिंपरी: गर्भपातासाठी गोळ्या घेण्यास पत्नीने नकार दिला असता पतीने तिला बेदम मारहाण केली. या घटनेत तिचा गर्भपात झाला आहे. तर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चऱ्होली बुद्रुक, आळंदी येथे ऑगस्ट २०१९ ते १८ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली आहे. केतन राजू तापकीर (वय २८), सुशीला राजू तापकीर (वय ४६), राजू सुदाम तापकीर (वय ५८, सर्व रा. आळंदी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी घरातील कामे करत नाही. जेवण बनवता येत नाही, कचरा व्यवस्थित साफ करत नाही, अशा कौटुंबिक कारणावरून भांडण करून आरोपींनी शिवीगाळ केली. पती केतन तापकीर याने गर्भपात करण्यासाठी पत्नीला डॉक्टरकडे नेऊन गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या नाहीत. म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. मूल जिवंत जन्माला न येण्याच्या उद्देशाने पत्नीला हाताने मारहाण करून भिंतीवर आपटले. मुलाला जन्म कशी देतेस ते बघतो, अशी दमदाटी केली. या प्रकारामुळे रक्तस्त्राव होऊन गर्भपात झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.