धक्कादायक! महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व मारहाण, विश्रांतवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 19:58 IST2021-01-07T19:57:31+5:302021-01-07T19:58:43+5:30
महिला वाहतूक पोलिसांसह दोन मदतनीस कामगारांना शिवीगाळ करत दगडफेक करून जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार

धक्कादायक! महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व मारहाण, विश्रांतवाडी येथील घटना
येरवडा : महिला वाहतूक पोलिसांसह दोन मदतनीस कामगारांना शिवीगाळ करत दगडफेक करून जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी विश्रांतवाडी परिसरात घडला. याप्रकरणी विश्रांतवाडीपोलिसांनी सहा टवाळखोर तरूणांविरुद्ध सरकारी कामात अडथळयासह बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ व दगडफेक करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा वाहतूक शाखेच्या पोलीस नाईक वंदना आल्हाट यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेत केलेल्या मारहाणीत संतोष रायकर व लखन शेंडगे हे दोन मदतनीस कामगार जखमी झाले आहेत. संबंधित टवाळखोर तरुणांवर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. तसेच शांतिनगर परिसरातील महिला व कार्यकर्त्यांनी देखील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व येरवडा वाहतूक शाखेबाहेर गर्दी केली होती. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह दोघांना झालेल्या मारहाणीची गंभीर नोंद घेत पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत बुधवारी रात्री उशिरा थेट गुन्हे दाखल केले.
बुधवारी दुपारी आळंदी रस्त्यावरील ऑर्बिट मॉल बाहेर नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करत असणाऱ्या महिला पोलीस नाईक आल्हाट यांना दुचाकी वरून आलेल्या तीन तरुणांनी वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत आणखी तिघा साथीदारांना त्यांनी बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून कारवाईसाठी मदत करणाऱ्या दोन कामगारांवर दगडफेक करीत जखमी केले. तसेच पोलीस नाईक आल्हाट यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करून दगडफेक करीत सर्व आरोपी पसार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी आरोपींची एक दुचाकी हस्तगत केली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करू नये यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत हस्तक्षेप सुरू होता. मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सहा आरोपींविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज वरून फरार आरोपींचा शोध विश्रांतवाडी पोलिस घेत आहेत.