धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:11 PM2021-04-23T20:11:42+5:302021-04-23T20:19:53+5:30

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे....

Shocking! Arrest of nurse selling black market in remedicivir injection to patients | धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक

धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक

Next

पुणे : कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या  फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. रुग्णाला पहिल्या दिवशी दिल्या जाणार्‍या दोन इंजेक्शनपैकी ही परिचारिका फक्त एकच इंजेक्शन देत आणि दुसरे इंजेक्शन काळाबाजारात विकत असल्याचे आढळून आले आहे. 

रिबिका विनोद वैरागर (वय ३५, रा. मासाळ चाळ, पिसोळी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून ४ व अंकित सोलंकी याच्याकडून ३ अशी ७  रेमडेसिविर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. रिबिका ही हडपसर येथील एका खासगी कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून काम करीत आहे. 

अंकित विनोद सोलंकी (वय २६, रा. सुखवानी कॉम्प्लेक्स, दापोडी) या फार्मासिस्टला कोंढवा पोलिसांनी अगोदर अटक केली होती. 
कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना अंकीत सोलंकी हा कोंढव्यातील जायका हॉटेलजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सय्यद यांनी साध्या वेशामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व पोलीस अंमलदार यांच्या पथकाला बनावट ग्राहक तयार करुन इंजेक्शन घेण्यास पाठविले. यावेळी सोलंकी याने अंमलदाराला जायका हॉटेलच्या बाजूला नेऊन त्यांना दोन इंजेक्शन दाखविले. एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच एका इंजेक्शनसाठी १० हजार रुपये रोख स्वीकारले. नंतर १० हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात मागणी करत होते. यावेळी पोलिसांनी छापा टाकून या फार्मासिस्टला पकडले होते. 

अंकित सोलंकी याने अगोदर पोलिसांची सातत्याने दिशाभूल केली. इंजेक्शन कोठून मिळविली, याची त्याने वेगवेगळी कारणे सांगितले. ती सर्व खोटी निघाली. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी आपल्यापद्धतीने चौकशी केल्यावर त्याने खरा प्रकार सांगितला. 
त्याला पकडले, त्याच्या अगोदर त्याचा एका महिलेला फोन झाला होता. त्याबाबत चौकशी केल्यावर या महिलेने इंजेक्शन आणून दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अंकितला पुन्हा या महिलेला फोन करायला सांगितले. त्यानुसार त्याने फोन केल्यावर ती ४ इंजेक्शन घेऊन आली. पोलिसांनी तिला पकडले. तिच्याकडे चौकशी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. 

अशी करत होती इंजेक्शनची चोरी 
रिबिका ही हडपसर येथील एका कोविड सेंटरमध्ये परिचारिका म्हणून कामाला आहे. कोविड रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शनचा ६ इंजेक्शनचा कोर्स असतो. त्यापैकी २ इंजेक्शन्स पहिल्या दिवशी दिली जातात व नंतर दररोज एक अशी पुढील चार दिवस  इंजेक्शन दिले जाते. हे काम परिचारिकाच करतात. रुग्णाला पहिल्या दिवशी इंजेक्शन देताना रिबिका दोन ऐवजी फक्त एकच इंजेक्शन देत असे. दुसरे इंजेक्शन ती चोरत असे. त्यानंतर ती ते बाहेर काळाबाजारात विकत असे. 

अंकित याला पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याच्याकडे २ इंजेक्शन होती. आणखी एक इंजेक्शन त्याच्या गाडीच्या डिकीत पोलिसांना मिळाले. याशिवाय वापरलेल्या इंजेक्शनच्या ५ बाटल्या डिकीत आढळून आल्या. तसेच रिबिकाकडील ४ इंजेक्शन अशी ७ इंजेक्शन पोलिसांनी जप्त केली आहेत. तिने आणखी कोणा कोणाला ही इंजेक्शन दिली याचा तपास पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे करीत आहेत.

Web Title: Shocking! Arrest of nurse selling black market in remedicivir injection to patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.