धक्कादायक! जिल्हा न्यायालयाच्या आवारात मानवी कवटी जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 08:34 PM2020-09-07T20:34:26+5:302020-09-07T20:35:10+5:30
मुद्देमाल उघड्यावर केला जात होता नष्ट
पुणे : शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघड झाला आहे. नवीन इमारतीच्या मागील बाजूला सोमवारी दुपारी साडेबारा वाजता मानवी कवटी व दात जाळण्यात येत होत्या.काही वकिलांनी आक्षेप घेतल्यानंतर हा मुद्देमाल न्यायालय प्रशासनाने पुन्हा ताब्यात घेतला.
याबाबत अॅड. योगेन काकडे यांनी सांगितले की, आपल्या अशिलाच्या काही प्रकरणाची आज सुनावणी होती. त्यासाठी आपण न्यायालयात आलो होतो. न्यायालयातील कामकाज पूर्ण करुन आपल्याला दुसरीकडे जायचे असल्याने गाडी काढण्यासाठी नवीन इमारतीच्या मागील बाजूला ते गेले होते. त्यावेळी तेथे काही तरी जाळले जात असल्याचे दिसले. त्यामुळे उत्सुकता म्हणून पहायला गेलो तर, तेथे मानवी कवटी, दात जाळले जात होते.
न्यायालयीन प्रक्रियेनुसार मुद्देमाल नष्ट करण्यात येतो. मात्र, त्यात मानवी कवटी, दात असतील तर ते उघड्यावर आणि न्यायालयाच्या आवारात नष्ट केले जात नाहीत. मानवी कवटी नष्ट करायची असेल तर ती जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने नष्ट केले जाते. अॅड. काकडे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर न्यायालय प्रशासनाने संबंधित मुद्देमाल पुन्हा ताब्यात घेतला.