धक्कादायक! औंध जिल्हा रुग्णालयात चक्क रक्ताची अदलाबदल, रुग्ण आयसीयूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:02 AM2024-03-26T11:02:42+5:302024-03-26T11:05:38+5:30
परिचारिकेचा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवावर बेतणारा असून, या दाेन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे...
पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळले जात असून, शनिवारी (दि. २३)तर कहरच झाला आहे. येथे उपचारासाठी दाखल शेजारी-शेजारी असलेल्या दाेन रुग्णांना द्यायच्या रक्त गटाचीच अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. परिचारिकेचा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवावर बेतणारा असून, या दाेन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
औंध येथील इंदिरा वसाहतीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना गुरुवारी (दि. २१) दुपारी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्यूमाेनिया झाल्याने श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात-पाय सुजलेले आणि पोट फुगलेले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. २३) जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली आणि सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना केली. शेजारीच असलेल्या दगडू कांबळे या रुग्णालाही रक्त चढवायचे हाेते.
साेनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह, तर कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह हाेता. त्यांच्या नावाने रक्ताच्या पिशव्यादेखील आल्या. मात्र, संबंधित ड्युटीवरील परिचारिकेने निष्काळजीपणा करत सोनवणे यांची पिशवी कांबळे यांना, तर कांबळे यांची पिशवी साेनावणे यांना चढवली. विरुद्ध रक्त चढवल्याने त्यांना त्याची रिॲक्शन आल्यानंतर आणि नातेवाइकांनी तक्रार केल्यावर त्या रक्तपिशव्या काढण्यात आल्या आणि रुग्ण कांबळे व साेनावणे यांना तत्काळ आयसीयू कक्षात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले. आता दाेघांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले.
परिचारिका माेबाईलवर...
दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांनी केला आहे. ज्या मेडिसिन वाॅर्डमध्ये उपचार सुरू हाेते, ताे डाॅ. किरण खलाटे यांच्या अंतर्गत आहे. आता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
आमदार अश्विनी जगताप यांनी दिली भेट :
या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी तातडीने घटनास्थळी जात रुग्ण आणि नातेवाइकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. तसेच ड्युटीवरील डाॅक्टर, परिचारिकांना धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी तातडीने करण्याचे आदेश आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
हाॅस्पिटलमध्ये हाेतात बिर्याणी पार्ट्या अन् वाढदिवस :
जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा दुय्यम बनल्याचे विविध घटनांवरून समाेर आले आहे. आयसीयू कक्षाच्या बाजूलाच असलेल्या कक्षात डाॅक्टर, परिचारिका यांच्या बिर्याणी पार्ट्या, वाढदिवस साजरे हाेतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता तरी प्रशासन याची दखल घेऊन कडक करवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
रक्त आल्यानंतर ते बराेबर आहे का? याची खातरजमा करूनच ते चढविण्याची सूचना डाॅक्टर देत असतात. ते रक्त चढविण्याची जबाबदारी परिचारिकांची असते. परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे दाेन्ही रुग्णांना रक्त चुकीचे लावले गेले. त्यामुळे संबंधित परिचारिकेला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. याबाबत चाैकशी करण्यात येत आहे.
- डाॅ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय
या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने चाैकशी अहवाल मागविला आहे. अहवाल आल्यावर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- डाॅ. राधाकिशन पवार, आराेग्य उपसंचालक, पुणे परिमंडळ