धक्कादायक! जन्मदाखला दिला मुलाचा,आईवडिलांकडे सोपविली मुलगी; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 06:34 PM2020-08-17T18:34:04+5:302020-08-17T18:45:44+5:30
बाळ बदलल्याचा प्रशासनावर आरोप
पिंपरी : जन्मदाखला मुलाचा दिल्यानंतर एका खासगी रुग्णालयाने प्रत्यक्षात मात्र आईवडिलांकडे मुलगी सोपविली. आमचे बाळ बदलले आहे, असे आरोप बाळाच्या आईवडिलांनी केले. मात्र हे सर्व आरोपी रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. बाळासह आईवडिलांचे डीएनए तपासण्यात येईल, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिता अनिल जगधने (रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड) यांना प्रसुतीसाठी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि. १२) त्यांची प्रसुती झाली. त्यावेळी रिता यांच्या आई हिराबाई नवपुते रुग्णालयात उपस्थित होत्या. तुमची मुलगी रिता यांना मुलगा झाल्याचे संबंधित परिचारिकेने हिराबाई यांना सांगितले. जन्मत: बाळाची प्रकृती नाजूक असल्याचे कारण सांगून बाळाला अतिदक्षता विभागात उपचार करण्याचे कारण सांगून काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या जन्म नोंदणीच्या दाखल्यावर संबंधित बाळाची मुलगा अशी नोंद करण्यात आली.
दरम्यान रुग्णालयातील परिचारिका बाळाच्या आईकडून दूध घेऊन काचेच्या पेटीत ठेवलेल्या बाळाला पाजायच्या. तीन दिवसांत तब्येतीत सुधारणा झाल्याने बाळाला आईकडे दिले. त्यामुळे जगधने दाम्पत्य व नातेवाईक आनंदात होते. बाळाने शी केली आहे का, अशी शंका आल्याने त्यांनी बाळाला बघितले. आपल्या हातातील बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रिता यांच्या आई हिराबाई यांनी तातडीने रुग्णालयाला याचा जाब विचारला.
अनिल जगधने याबाबत म्हणाले, ‘‘रुग्णालयातील प्रत्येक कागदावर मुलगी असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच डीएन तपासणीनंतर वास्तव समोर येईल, असे रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी आईवडील म्हणून आमचे तसेच बाळाचे रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.’’
................
बाळ बदलले नसून तसा काही प्रकार नाही. बाळाच्या नातेवाईकांचा काही गैरसमज झाला आहे. याप्रकरणी बाळासह त्याच्या आईवडिलांचा डीएनए तपासणीची प्रक्रिया करण्याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. प्रसुतीनंतर बाळाच्या नातेवाईकांनी अर्ज भरून द्यायचा असतो. या अर्जावरून महापालिकेकडून जन्मदाखला तयार केला जातो.
- बरकत मुजावर, संचालक, सतर्कता व सुरक्षा विभाग, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी