पुण्यात जात पडताळणी कार्यालयाचा खळबळजनक दावा; नितीन ढगेच्या कारवाईनंतर सर्वच रेकॉर्ड झाले खराब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 08:47 PM2021-10-20T20:47:59+5:302021-10-20T21:02:16+5:30
मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी (caste verification office) समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य म्हणजेच सर्वच रेकॉर्ड खराब झाल्याचा दावा कार्यालयाने केला आहे
पुणे : मुसळधार पावसाचे पाणी शिरल्यामुळे येरवडा येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयातील पडताळणीचे, इतर अभिलेख, संगणक आदी साहित्य म्हणजेच सर्वच रेकॉर्ड खराब झाल्याचा दावा (caste verification office) कार्यालयाने केला आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त नितीन ढगे (Nitin Dhage) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Department) कारवाई नंतर जात पडताळणी कार्यालयाकडून 9 ऑक्टोबरच्या पावसात सर्व रेकॉर्ड खराब झाल्याचे जाहिर केल्याने या प्रकरणातील गौडबंगाल वाढले आहे.
येरवडा परिसरात 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे समिती कार्यालयातील मागील बाजूची कारागृहाची संरक्षण भिंत कोसळली. त्यामुळे पावसाचे पाणी जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात शिरले. पावसाचे पाणी रात्रभर कार्यालयात साचून राहिल्यामुळे समिती कार्यालयात जमिनीवर ठेवण्यात आलेले जात प्रमाणपत्र पडताळणीचे व इतर अभिलेख, संगणक तसेच इतर साहित्य भिजून खराब झाले आहे.
सध्या समिती कार्यालयातील भिजलेले अभिलेख सुकवून, यादी तयार करावयाचे कामकाज सुरु असल्याने जात प्रमाणपत्र पडताळणीचे चौकशीसाठी समिती कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी प्रस्ताव सादर केलेली पोहोच पावती व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या छायांकीत प्रतीसह उपस्थित रहावे, जेणेकरुन त्यांचे प्रस्ताव कार्यालयात उपलब्ध नसल्यास प्रस्तावांची पुनर्बांधणी करुन समितीमार्फत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे. परंतु 9 ऑक्टोबर रोजी रेकॉर्ड खराब झाले असताना जात पडताळणी कार्यालयाला दहा पंधरा दिवसानंतर जाग कशी आली असा सवाल उपस्थित केला जात आहे.