धक्कादायक! खासगी रुग्णालयाने चक्क बिलासाठी अडवला कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 08:17 PM2021-04-16T20:17:33+5:302021-04-16T20:18:38+5:30
राजकीय नेत्याच्या मध्यस्थीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
उरुळी कांचन: उरुळी कांचन परीसरातील एका खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने चक्क बिलासाठी एका पंच्चावन्न वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णाचा मृतदेह तब्बल पाच तासाहून अधिक काळ अडवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका राजकीय नेत्याच्या हमीनंतर रुग्णालय प्रशासनाने मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केला आहे. पुर्व हवेलीमधील खासगी रुग्णालये मनमानी व अडवणूक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पुणे-सोलापुर महामार्गालगतच्या एका छोट्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिपाई म्हणुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पंचावन्न वर्षीय वडीलांना कोरोनाची लागण झाली. मागील पंधरा दिवसापासून ते उरुळी कांचन मधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालय प्रशासनाने या पंधरा दिवसाच्या काळात संबधित रुग्णांच्या नातेवाईकाकडून पाच लाख रुपये अनामत रक्कम भरुन घेतली होती. मात्र रुग्ण गुरुवारी सांयकांळी पाच वाजण्याच्या सुमारास दगावला. यावेळी रुग्णालय प्रशासनाने संबधित रुग्णाचे पंधरा दिवसाचे सहा लाख वीस हजार रुपयांचे बिल मृताच्या नातेवाईकांच्या हातावर ठेवले.
दरम्यान सहा लाख वीस हजार पैकी मृतांच्या नातेवाईकांनी पाच लाख रुपये अगोदरच भरले होते. मृताच्या नातेवाईकांची आर्थिक परस्थिती हलाखीची असल्याने मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे बिलात सवलत देण्याची मागणी केली. मात्र बिलात सवलत देण्यास रुग्णालयाने ठाम नकार देत संपुर्ण बिल भरल्याशि्वाय मृतदेह ताब्यात देणार नसल्याचे नातेवाईकांना सांगितले. यावर मृताच्या मुलाने बिल भरण्यास थोडीफार मुदत देण्याची मागणी केली. या मागणीस पण रुग्णालय प्रशासनाने नकार दिला. अखेर सहा तासांनतर एका सहकारातील जेष्ठ राजकीय नेत्याने उर्वरीत बिल भरण्याची हमी दिल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृत व्यक्तीचा मृतदेह संबधित व्यक्तीच्या मुलाच्या ताब्यात दिला. नातेवाईकांनी पैशासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप खाजगी रुग्णालय प्रशासनावर केला असला तरी, रुग्णालय प्रशासनाने मात्र वरील आरोप फेटाळुन लावला आहे.
खाजगी रुग्णालयांकडुन अवाच्या सवा बिल आकारणी
दरम्यान एकीकडे बिलासाठी मृतदेह अडवुन ठेवल्याचा आरोप होत असतानाच, दुसरीकडे पुर्व हवेलीमधील अनेक खाजगी रुग्णालये कोविड रुग्णांकडून अवाच्या सवा बिल आकारणी करत रुग्णालये पन्नास हजार ते सहा लाखापर्यंत बिल आकारत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे येऊ लागल्या आहेत. मोठ्या रुग्णालयाच्या तुलनेत सुविधा कमी असतांनाही छोट्या रुग्णालयातून वाढीव बिल घेत असल्याचा आरोप जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटे प्रमाणे याही वेळी खासगी रुग्णालयांच्या सरसकट बिलांचे ऑडीट करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.