धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:21 IST2025-03-26T07:20:40+5:302025-03-26T07:21:22+5:30
अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा

धक्कादायक! पुण्याजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृत अर्भक, मानवी अवयवांच्या ११ बरण्या
लोकमत न्यूज नेटवर्क, दौंड (पुणे): शहरातील कचराकुंडीत अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव आढळल्याने मंगळवारी मोठी खळबळ उडाली. बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका बॉक्समध्ये एक अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. मात्र, अवयवांच्या बरण्या कचऱ्यात टाकणाऱ्या रुग्णालय प्रशासनाला अभय मिळत असल्याची चर्चा आहे.
‘लोकमत’चे प्रश्न
१. बॉक्स उकिरड्यावर गेला कसा?
२. हॉस्पिटलमधून बरण्यांचा बॉक्स गेला? हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई का नाही?
३. पोलिसांनी अज्ञातांवर म्हणण्याचे कारण काय?
बरण्यांमधील मानवी अवयव नेमके कुणाचे?
एका बाटलीत मृत अवस्थेत असलेले एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य ११ बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष होते. बॉक्सवर भंगाळे हॉस्पिटलचा नामोल्लेख असल्याने डॉक्टरांकडे पोलिसांनी चौकशी केली. बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बरण्यांवर रुग्णांची नावे होती. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप गुजर यांनी बरण्या व अवयवांची तपासणी केली. पुरुष जातीचे अर्भक असल्याचे पुढे आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी ११ बरण्यांवर असलेल्या रुग्णांच्या नावांच्या कागदपत्रांची फाइल पोलिसांना सादर केली आहे. पोलिस आणि उपजिल्हा रुग्णालय चौकशी करत आहे. या चौकशीतून वस्तुस्थिती पुढे येईल, असे दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर म्हणाले.
महिला आयोगाचा काय संबंध? : या घटनेसंदर्भात राज्य महिला आयोगाने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. मानवी अवशेष रुग्णालयाकडे २०२० पासून अभ्यासासाठी आहेत व नजरचुकीने कचऱ्यात गेले, अशी प्राथमिक माहिती आहे. पण, यात महिला आयोगाचा काय संबंध, हे कोडेच आहे.
मृत अर्भक साडेचार महिन्यांचे असून, त्याच्या नातेवाइकांना अर्भक नेण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी नेले नाही. बाकीच्या बरण्यांत गर्भाशयाची पिशवी काढलेले, अपेंडिक्स, हर्निया असे अवयव होते. ते २०२० पासून चुकून आमच्याकडे राहून गेले आहेत.
-डॉ. प्रमोद भंगाळे, भंगाळे हॉस्पिटल
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी गेलो. घटनेचा पंचनामा केला त्यानुसार योग्य ती चौकशी सुरू केलेली आहे.
-बापूराव दडस, उपविभागीय पोलिस अधिकारी