कसब्यात धक्कादायक पराभव

By admin | Published: February 24, 2017 03:40 AM2017-02-24T03:40:25+5:302017-02-24T03:40:25+5:30

शहरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक १६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण

Shocking defeat | कसब्यात धक्कादायक पराभव

कसब्यात धक्कादायक पराभव

Next

पुणे : शहरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक १६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रवींद्र धंगेकर यांनी अखेर भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांना धूळ चारून पाचव्यांदा महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसब्यात बीडकर यांचा पराभव, हा बापटांना मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र धंगेकर यांच्या भाजपाप्रवेशाला सुरुवातीपासून गिरीश बापट व गणेश बीडकर यांनी विरोध केला होता़ खासदार संजय काकडे हे धंगेकर यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यासाठी आग्रही होते़ त्यातून गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यातील वाद उफाळून आला होता़ पालकमंत्र्यांच्या विरोधामुळे धंगेकर यांनी शेवटी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ पण, ए व बी फॉर्म देताना काँग्रेसने घोळ घातला़; त्यामुळे त्यांना ‘पंजा’ या चिन्हाऐवजी ‘फॅन’ हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढावे लागले़ गणेश बीडकर आणि रवी धंगेकर यांच्याकडे कसब्यातील भावी आमदारकीचे उमेदवार म्हणून पाहिले जात होते़ त्यामुळे एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्यात दोघांनीही एकही संधी सोडली नव्हती़ प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच धंगेकर यांना मतदार स्वीकारणार, की मोदीलाटेत धंगेकर वाहून जाणार, याबाबत चर्चा सुरू होती. त्यामुळे अर्ज भरण्यापासून माघारीच्या वेळीही त्यांच्यात हाणामारी झाली होती़ यामुळेच तिन्ही सर्वाधिक संवेदनशील प्रभाग असलेल्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाची मतमोजणी शहरापासून दूर अशा बालेवाडी क्रीडासंकुलात ठेवण्यात आली होती़ दुपारी ३ नंतर प्रभाग १६ची मतमोजणी सुरू झाली़ पहिल्या फेरीपासून धंगेकर यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली़ प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढत गेली़ तरीही, प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून त्याअगोदर मतमोजणी झालेल्या प्रभाग १४च्या उमेदवारांची मते जाहीर केली जात होती़ दुसरीकडे, गणेश बीडकर यांचा ‘विजयी मिरवणुकीत सहभागी व्हा,’ असा मेसेज फिरू लागला़ त्यामुळे शहरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली़ शेवटी धंगेकर विजयी झाल्याचे सांगण्यात आले़ तरी, अधिकृतपणे केवळ पहिल्या फेरीतील मतेच जाहीर करण्यात आली होती़
गणेश बीडकर यांना दुसरा पर्याय उपलब्ध असतानाही धंगेकरांविरोधात निवडणूक लढविण्याचा आणि जिंकून येणार असल्याचा अतिआत्मविश्वास नडल्याचे या वेळी बोलले जात आहे.

सुजाता शेट्टींचा निसटता विजय
प्रभाग क्रमांक १६ मधील क गटात काँग्रेसच्या सुजाता शेट्टी यांनी भाजपाच्या वैशाली सोनवणे यांचा १२९ मतांनी पराभव केला़ शहरातील सर्वांत निसटता विजय ठरला आहे़ सुजाता शेट्टी यांना १२ हजार ५६ मते पडली तर, वैशाली सोनवणे यांना ११ हजार ९२७ मते मिळाली़ शहरात भाजपाची लाट असताना शेवटपर्यंत या गटात कोण विजयी होईल, याची कोणालाही खात्री नव्हती़
डिस्प्ले दिसत नसल्याने उशीर
प्रभाग क्रमांक १४ ची मतमोजणी सुरू असताना एका मशिनचा डिस्प्ले दिसत नसल्याने मतमोजणी खोळंबून राहिली़ त्यामुळे त्या मशिनची मेमरी काढून त्यावरील मते मोजण्यात आली़ या सर्व प्रकारात ४० मिनिटे उशीर झाला़


सुरुवात आणि शेवटही भांडणाने
प्रभाग १६ मधील भाजपाचे गटनेते गणेश बीडकर आणि काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांच्यातील या लढतीची सुरुवात हाणामारीने झाली आणि गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी वादावादीने तिचा शेवट झाला़ अर्जमाघारीच्या दिवशी गणेश बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती़ बालेवाडी येथे गुरुवारी या प्रभागाची सर्वांत शेवटी मतमोजणी सुरू होती़ त्या वेळी धंगेकर हे आघाडीवर होते़ दुसरीकडे, सायंकाळी ७ वाजता ‘विजयी मिरवणुकीत सहभागी व्हा,’ असा गणेश बीडकर यांचा मेसेज फिरू लागला; त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला़ या वेळी केवळ ३ टेबलांवरील मतमोजणी शिल्लक राहिली होती़ त्यात धंगेकर यांचा विजय निश्चित झाला होता; मात्र या मेसेजमुळे दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये वादावादी सुरू झाली़ त्यातून मतमोजणीच्या ठिकाणी गोंधळ व आवाज वाढला़ काय चालले आहे, हे कोणालाच समजत नव्हते़ निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना बाहेर जाण्यास सांगितल्यावर वाद थांबला़ त्यामुळे काही वेळ मतमोजणी थांबली होती़ अशा प्रकारे निवडणुकीचा शेवटही वादावादीने झाला़

कोणाच्याही विरोधात किंवा एखाद्याला हरविण्यासाठी शत्रू म्हणून कधीही निवडणूक लढवली नाही. निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून उतरून २० वर्षांत जनतेची कामे केली आहेत. मी एक जनसेवक असून, मोदीलाटेतही नागरिकांनी माझ्या कामावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचा सदैव ऋणी राहीन. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी जनतेची सेवा करीत राहीन.
- रवींद्र धंगेकर,
काँग्रेस पुरस्कृत

Web Title: Shocking defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.