धक्कादायक..! प्रेयसीचे अश्लील चित्रीकरण वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:30 PM2018-08-07T16:30:03+5:302018-08-07T16:41:21+5:30
प्रतीककडून मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडीओ आला. तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती.
लोणी काळभोर : कॉलेजमधील विद्यार्थी प्रेयसीला व्हिडीओ कॉल करत तिला कपडे काढण्यास सांगून त्याचे अश्लील चित्रीकरण करून ते वेबसाईटवर टाकण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध २० वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लोणी काळभ़ोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राजेंद्र जाजू (रा. लासूर, जि. औरंगाबाद) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी सध्या लोणी काळभोर येथील एका युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तिची प्रतीकसोबत शाळेत इयत्ता ९वी ते १२वीपर्यंत मैत्री होती. त्यानंतर तो औरंगाबाद येथे गेला होता. नोव्हेंबर २०१७मध्ये त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती त्याला भेटायला दोन ते तीन वेळा औरंगाबाद येथे गेली होती. दोघांमध्ये मोबाईलवरून व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे होत असे, तेव्हा तो तिला अंगावरील कपडे काढण्यास सांगत असे. त्याप्रमाणे ती करत होती. सदर कॉल मार्च ते एप्रिल २०१८ या कालावधीत झाले होते. त्यानंतरही त्यांचे मोबाईल चॅटिंग सुरू होते.
१५ जुलै रोजी तरुणी लोणी काळभोर येथील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी आली होती. ती आपल्या लोणी काळभोर गावात भाडेतत्त्वावर घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत असताना त्यावेळी रात्री सव्वादहाच्या सुमारास तिला मोबाईलवर प्रतीककडून व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडीओ आला.तिने तो पाहिला असता तिला धक्का बसला. कारण, त्यात ती विवस्त्रावस्थेत होती. यापूर्वी त्याने व्हिडीओ कॉल करून तिला कपडे काढण्यास सांगत त्याचे चित्रीकरण केले होते. त्यानंतरही प्रतीकने तिला मेसेज करून व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ५ लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तो तिला रोज छळत असल्याने तिने ही बाब तिच्या भावाला सांगितली. याबाबत चर्चा करून तिने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ७ आॅगस्ट रोजी प्रतीक राजेंद्र जाजू (रा. लासूर, ता. जि. औरंगाबाद) याच्याविरोधात फिर्याद दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे हे पुढील तपास करत आहेत.