धक्कादायक.. ! पिण्याचा पाण्याचा प्रवास गटारातून...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:05 PM2018-06-28T19:05:38+5:302018-06-28T19:15:50+5:30
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटींना पिण्याचा पाणी पुरवठा करणारी वाहिनी जर गटारातुनआणण्यात आली असेल तर हा प्रकार नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ केल्यासारखेच आहे
पुणे : लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून बी. टी. कवडे रस्ता परिसर, भीमनगर, जहांगीर नगर, सोपान बाग, मगरपट्टा ते अगदी हडपसरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वाहिनी लहान (बेबी) कालव्यामधून आणण्यात आली आहे. मात्र, या कालव्यामध्ये सांडपाणी, कचरा साचलेला असून त्याला गटाराचे स्वरूप आलेले आहे. यामध्ये सांडपाणी आणि कच-याचे प्रमाण खूप मोठे असून येथील पाण्याला दुर्गंधी आलेली आहे. याच गटारातून या उच्चभ्रू परिसराला पाणीपुरवठा केला जात असल्याने, येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
तसेच या ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या सांडपाण्यामध्ये डासांची संख्याही वाढलेली आहे. अद्याप या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून स्वच्छता करण्यात आलेली नाही, ती स्वच्छता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय अडागळे, प्रमोद कवडे, सचिन दळवी यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही समस्या असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथे स्वच्छता करावी आणि या जलवाहिन्या लहान (बेबी) कालव्यातून हालावाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
..................
सध्या मोठ्या प्रमाणात डेंगीचे रूग्ण आढळत आहेत. डासांमुळे हा परिणाम होत आहे. पण महापालिका आरोग्य विभागाकडून त्याबाबत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत. घोरपडी परिसरात कालव्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. त्यामुळे सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या कालव्यातून पिण्याच्या पाण्याची वाहिनी जाते. त्यामध्ये घाण पाणी मिसळल्याने आजारांत अजून वाढ होणार आहे.
- विजय अडागळे