हिंजवडीत थरकाप उडवणारी घटना; ट्रकखाली चेंगरलेल्या तरुणाचा आकांत, ट्रक ढकलून काढला मृतदेह
By नारायण बडगुजर | Published: August 24, 2023 05:35 PM2023-08-24T17:35:22+5:302023-08-24T17:35:48+5:30
चेंगरलेल्या अवस्थेत असतानाही चाकाखालून बाहेर काढावे म्हणून दुचाकीस्वाराचा जिवाचा आकांत सुरु होता
पिंपरी : कामावर जात असलेल्या तरुणाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. त्यामुळे तरुण दुचाकीवरून खाली पडून ट्रकच्या मागील चाकाखाली चेंगरला. यात गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे बुधवारी (दि. २३) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
रामदास दिगंबर वडजे (वय २७), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचा चुलत भाऊ संजय माधव वडजे (वय २८, रा. गुरुव्दारा चौक, आकुर्डी) यांनी याप्रकरणी हिंजवडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रंगनाथ रामभाऊ तांबे (वय ४५, रा. भिवंडी वाडा रस्ता, झिडके गाव, दिघशी, जि. ठाणे) या ट्रकचालकाला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास वडजे हा तरुण रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. तीन वर्षांपासून शहरात ते वास्तव्यास होते. ते रोजंदारीवर काम करायचे. बुधवारी सकाळी ते दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघाले. त्यावेळी हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात रंगनाथ तांबे याच्या ताब्यातील ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरात धडक बसली. यात रामदास वडजे हे दुचाकीवरून खाली पडले. त्यावेळी ट्रकच्या मागच्या चाकाखाली चेंगरल्याने रामदास गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. त्यावेळी ट्रकचालक भीतीने पळून गेला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. काही नागरिकांनी रामदास यांना चाकाखालून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ट्रक ढकलण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. मात्र, अवजड असल्याने ट्रक ढकलता येत नव्हता. त्याचवेळी पीएमपीएमएल बस थांबवून बसमधील प्रवाशांच्या मदतीने ट्रक ढकलण्यात आला. मात्र, तोपर्यंत चेंगरलेल्या रामदास यांची प्राणज्योत मालवली. रामदास वडजे यांचा मृतदेह सांगवी येथील जिल्हा शल्य चिकित्सालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
चुलत भावाचा थरकाप
चेंगरलेल्या अवस्थेत असतानाही रामदास वडजे यांनी जिवाचा आकांत केला. कोणीतरी आपल्याला चाकाखालून बाहेर काढावे, असे म्हणून मदतीसाठी त्यांचा आकांत सुरू होता. त्यांची ती अवस्था पाहून नागरिकांचे हृदय हेलावले. दरम्यान, रामदास याचा चुलत भाऊ संजय वडजे हे देखील दुचाकीवरून लक्ष्मी चौकातून जात होते. त्यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी पाहून ते थांबले. कशामुळे गर्दी झाली आहे, असे म्हणून ते घडलेला प्रकार पाहण्यासाठी गर्दीत शिरले. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ रामदास वडजे हा ट्रकखाली चेंगरल्याचे त्यांना दिसून आले. ते पाहून संजय वडजे यांचा थरकाप उडाला.