इंदापुरातील धक्कादायक घटना; ‘निरा भीमा’ प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 08:45 PM2023-11-22T20:45:08+5:302023-11-22T20:45:49+5:30
लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते
कळस : इंदापुर तालुक्यातील काझड हद्दीत निरा भीमा जलस`थिरीकरण प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात दोन शेतकरी पडल्याची घटना बुधवारी(दि २२) सायंकाळी घडली. लाकडीे कळस मार्गावर या प्रकल्पाच्या एका ‘ओपन स्पेस’ मधुन हे शेतकरी बोगद्यात टाकलेल्या विद्युतपंपाची तपासणी करण्यासाठी गेले होते.या पंपामधुन पाणी येणे बंद झाल्याने हे दोघे त्या ठीकाणी गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, हे दोघे सायंकाळी उशीरानंतर देखील घरी परतले नाहीत. त्यामुळे नाना नरुटे आणि अन्य नातेवाइक त्यांचा शाेध घेण्यासाठी घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा इतरत्र कोठेही शोध लागला नाही. घटनास्थळी असलेल्या दोघांच्या दुचाकीवरुन हा प्रकार लक्षात आल्याचे शिक्षक नाना नरुटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान,पाणी येत नसल्याने विद्युतपंपाची पाहणी करण्यासाठी खाली उतरत असताना तोल जाऊन दोघेजण ३०० फुट खोल बोगद्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अनिल नरुटे (वय ३५) आणि रतिलाल नरुटे (वय ५५) अशी दोघा शेतकऱ्यांची नावे आहेत. हे दोघे चुलते पुतणे आहेत. दरम्यान,या दोघांचा शोध घेण्यासाठी,त्यांचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पोलीस प्रशासन तातडीनेघटनास`थळी धाव घेतली आहे. बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांना माहिती समजल्यानंतर त्यांनी याबाबत तहसिलदार श्रीकांत पाटील यांना आवश्यक सुचना दिल्या. तसेच भरणे यांच्या सुचनेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन सपकळ,तसेच पुतणे अनिकेत भरणे मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहचले आहेत.