पुण्यातील धक्कादायक घटना; लग्नात मानपान न दिल्याने विवाहितेच्या डोळ्यात टाकली मिरचीची पूड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 01:41 PM2023-02-23T13:41:45+5:302023-02-23T13:41:55+5:30
दुसरे लग्न असल्याने आपल्यामध्ये दोष असल्याचा भावनेने हा अमानुष छळ ती असह्यपणे सहन करत होती
कर्वेनगर : लग्न झाल्यानंतर विवाहितेला त्रास देण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. छळाला कंटाळून महिला टोकाचे पाऊलही उचलू लागल्या आहेत. अनेक विवाहितांना यामुळे जीव गमवावा लागत आहे. अशातच पुण्यातील कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात मनासारखा मानपान आणि हुंडा दिला नसल्याच्या कारणाने २२ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आला. हा प्रकार कोथरूड येथील सुतार येथे घडला. याप्रकरणी पिढीत विवाहितेचा पती, सासू आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
नागेश साहेबन्ने (वय २३), सासू रत्ना साहेबान्ने (वय ४२), आणि घराजवळ राहणारे महादेव जाधव व निमराज भिसे, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कोथरूड पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार विवाहितेचे पहिले लग्न झाले होते. दुसरे लग्न असल्याने आपल्यामध्ये दोष असल्याचा भावनेने हा अमानुष छळ ती असह्यपणे सहन करत होती. सासरच्यांनी मिरचीची पूड तिचा डोळ्यात, नाका- तोंडात टाकल्याने असह्य होऊन ओरडत असताना शेजारच्यांना ऐकू आले त्यावेळी त्यांनी पोलिस कंट्रोलला फोन करून ही माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी येऊन तिला सोडविले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.