खेड तालुक्यातील धक्कादायक घटना; बारा वर्षीय मुलीवर दोन महिने केला लैंगिक अत्याचार, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 02:44 PM2021-09-09T14:44:01+5:302021-09-09T14:45:20+5:30
तीन आरोपींना अटक केली असून तिघे फरार असल्याचं समोर आले आहे
राजगुरुनगर : खेड तालुक्यात पश्चिम भागातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६ जणांनी धमकावून दोन ते अडीच महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने खेडपोलिस ठाण्यात ६ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तीन आरोपींना खेड पोलिसांनीअटक केली असून तीन फरार झाले आहेत.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या घुमटकर, आकाश सुनिल शिंदे,परेश माणिक ढमाले, अवधुत संतोष कनसे, साईनाथ मुळुक , सुरज सुनिल रोडे सर्व (रा चास, ता. खेड) अशी त्यांची नावं आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही सोन्या घुमटकर यानं धमकी देऊन जबरदस्तीनं मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केले होते. व इतर पाच जणांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पिडित मुलीला धमकावून जबरदस्ती शारीरिक संबंध करून लैगिक अत्याचार केला.
मुलीने घरी आईला हा प्रकार सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत खेड पोलिसांनी सोन्या घुमटकर, आकाश शिंदे, सुरज रोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. परेश ढमाले, अवधुत कणसे, साईनाथ मुळूक हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक वर्षाराणी घाटे करित आहे.
पुण्यात मागील आठवड्यात पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि खडकी लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार झाला होता
पुण्यात ६ सप्टेंबरलाही लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणे रेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण करुन आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला.