धक्कादायक माहिती! येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले, गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 03:54 PM2024-06-26T15:54:58+5:302024-06-26T15:55:53+5:30

येरवड्यातील ५० मुलांची क्षमता असणाऱ्या बालसुधारगृहात सध्या ७० मुले वास्तव्याला आहेत

Shocking information Overcapacity in Yerwada Juvenile Correctional Institutions rising crime rate a cause for concern | धक्कादायक माहिती! येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले, गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण

धक्कादायक माहिती! येरवड्यातील बालसुधारगृहात क्षमतेपेक्षा जास्त मुले, गुन्हेगारीत वाढती संख्या चिंतेचे कारण

पुणे : पुण्यात ड्रग्स विक्री, कोयता गॅंग दहशत, वाहनांची तोडफोड, किरकोळ कारणावरून खून अशी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतीये. या गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांची वाढती संख्या चिंतेचे कारण झाले आहे. पुण्यात मध्यंतरी कोयता गँगची दहशत वाढली होती. काही भागात अल्पवयीन मुले कोयते घेऊनच फिरत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. यावरून शहरात भितिचे वातावरण निर्माण झाले होते. तर कल्याणीनगर प्रकरणानंतर अपघाताची अनेक प्रकरणे उघडकीस येऊ लागली. त्यामध्येही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे दिसून आले. पोलिसांसमोर या मुलांना गुन्हेगारीपासून रोखणे हे आव्हानच ठरतंय. अशातच पुण्याच्या बालसुधारगृहातून धक्कादायक माहिती समोर आलीये. येरवड्यातील ५० मुलांची क्षमता असणाऱ्या निरीक्षणगृहात सध्या ७० मुले वास्तव्याला आहेत. मागील काही दिवसांपासून या मुलांची संख्या वाढताना दिसू लागलीये.

येरवडा येथील गोल्फकोर्स परिसरात हे बाल सुधारगृह आहे. बाल वयात गुन्हे करणाऱ्या आणि पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या मुलांना कारागृहात न ठेवता त्यांना बाल सुधारगृहात ठेवले जाते. केंद्रातील निरीक्षणगृहात मुक्कामाच्या काळात मुलांचे समुपदेशन करणे, त्यांची आवड लक्षात घेऊन व्यग्र ठेवले जाते. बाल न्याय मंडळाच्या आदेशाने मुलांची सुटका केली जाते. याच बालसुधारगृहात मुलांची संख्या वाढणे हे चिंता करण्यासारखं आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणातही बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मुलांच्या हातून गंभीर गुन्हे घडू लागले आहेत. हे या पोर्शे प्रकरणावरून समोर आलंय. पालकांचा मुलांवर न राहिलेला वचक, मुलांना मिळणारी अतिप्रमाणातील मोकळीक, सोशल मीडिया, मोबाईल अशा अनेक कारणांमुळे मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. 

बालसुधारगृहात वाढलेल्या मुलांची संख्या पोलिसांना एक प्रकारे डोकेदुखीच आहे. त्या मुलाला बालसुधारगृहातून बाहेर सोडल्यावर तो पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे जाईल का? याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाहीये. त्यामुळे लहान वयातच मुलांना गुन्हेगारी क्षेत्राकडे जाण्यापासून थांबवणे गरजेचे आहे. पोर्शे अपघात प्रकरणात मुलाने मद्यपान केल्याचे समोर आले होते. या अगोदर किती अल्पवयीन मुले मद्यपान करत असतील? यावर सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. मुले व्यसनांच्या आहारी जाऊन गुन्हेगारीला सुरुवात करत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. आता पुणे पोर्शे अपघात प्रकरण, एफसी रोड ड्रग्स पार्टी यानंतर पोलीस पुन्हा अलर्ट मोडवर आले आहेत. पब, बार, हॉटेल यांच्याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली असून नियमबाह्य हॉटेल, बारवर कारवाई केली जात आहे. तसेच दारूच्या दुकानातून १८ वर्षांखालील मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आलीये. प्रशासनाने उचललेली कठोर पाऊले अल्पवयीन मुलांसाठी फायदेशीर ठरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.    

Web Title: Shocking information Overcapacity in Yerwada Juvenile Correctional Institutions rising crime rate a cause for concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.