धक्कादायक ! बोपदेव घाटात फेकला जातोय शहरातल्या हॉस्पिटलमधला 'मेडिकल वेस्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 01:20 PM2020-09-28T13:20:44+5:302020-09-28T13:34:35+5:30
ओढ्याच्या पाण्यात पीपीई किट, इतर साहित्यांचा खच
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल कचरा वाढला असून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याऐवजी शहराच्या आजू बाजूला तो टाकून दिला जात असल्याचे आढळून येत आहे. सासवडहून पुण्याकडे येणाऱ्या बोपदेव घाटात अनेक ठिकाणी असे वैद्यकीय साहित्य रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी टाकून दिल्याचे आढळून आले आहे.
कोरोना संसर्गामुळे सध्या वैद्यकीय कचरा वाढला आहे़ होम असोलिशन झालेल्या लोकांचा वैद्यकीय कचरा वेगळा गोळा करण्याची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. पीपीई किट, इंजेक्शनच्या सुया, हातमोजे, मास्क याचा वापर वाढला असल्याने त्याचा कचराही मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे़. शहरालगतच्या वस्त्यांमध्ये आणि गावांमध्ये असा वैद्यकीय कचरा गोळा करण्याची कोणतीही व्यवस्था झालेली दिसत नाही. त्याचबरोबर शहरातील कचरा हा बाहेर नेऊन टाकला जात असल्याचा संशय आहे.
याबाबत लोकमत चे वाचक देवेंद्र कुमार ठक्कर हे सासवडहून दुचाकीवरुन पुण्याकडे येत होते. त्यावेळी बोपदेव घाट उतरल्यानंतर रस्त्याकडेच्या ओढ्याजवळ थांबले असताना त्यांना ओढ्यात पीपीई किट व इतर वैद्यकीय साहित्य टाकून दिलेले आढळून आले. ओढ्याच्या पाण्यात हे साहित्या टाकून दिल्याने पुढे हे पाणी वाहत जाऊन ज्या ठिकाणी हे मिळते त्या ठिकाणी पाणी प्रदुषित होण्याचा धोका आहे.
याबाबत ठक्कर यांनी सांगितले की, बोपदेव घाट रस्त्यात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला वैद्यकीय कचरा टाकलेला आढळून येत आहे. त्यात वापरलेले पीपीई कीट, गोळ्यांचे बॉक्स, इंजेक्शनच्या सुया, तसेच इतर वैद्यकीय साहित्य दिसत आहे. हा वैद्यकीय कचरा टाकून पर्यावरणाचा व्हास केला जात आहे.
शहरालगतच्या बाहेर अशा प्रकारे अनेक ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकून दिलेला वेळोवेळी आढळून आला आहे. हा वैद्यकीय कचरा नेमका कोणी टाकला, महापालिकेच्या वतीने हॉस्पिटलमधून वैद्यकीय कचरा वेगळ्या वाहनांमार्फत गोळा केला जातो. मग महापालिकेच्या वाहनांमधून हा कचरा आडबाजूला जाऊन फेकून दिला जात आहे का? की हॉस्पिटलमधून हा कचरा फेकला जात आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.