धक्कादायक! कट रचून समोसामध्ये टाकले कंडोम, गुटखा; पाच जणांविरोधात गुन्हा, नेमका प्रकार काय?
By नारायण बडगुजर | Published: April 8, 2024 03:46 PM2024-04-08T15:46:51+5:302024-04-08T15:47:49+5:30
खाद्य पदार्थ पुरविण्याचा कंत्राट मिळावा म्हणून सामोसामध्ये धोकादायक वस्तू मिसळल्याचे सांगण्यात येत असून व्यावसायिक स्पर्धेतून हे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय
पिंपरी : व्यावसायिक स्पर्धेतून व्यावसायिकांनी प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थामध्ये आरोग्यास धोकादायक वस्तू टाकल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये सामोसामध्ये निरोध आणि गुटखा आढळला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ मार्च रोजी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
फिरोज शेख उर्फ मंटू असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह रहीम शेख, अझर शेख, मझर शेख (रा. मोरवाडी), विकी शेख यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार शंकरराव देसाई (वय ३६) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थ पुरविण्याचा करार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला आहे. देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथील मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उप कंपनीकडून सामोसा घेत असे. त्याबाबत त्यांनी करार देखील केला होता. मात्र एसआरएस एंटरप्रायझेसने पुरवलेल्या एका सामोसामध्ये प्रथमोपचार पट्टी मिळून आली. त्यामुळे देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीने ‘एसआरएस एंटरप्रायझेस’ सोबतचा करार रद्द केला.
देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स या कंपनीने सामोसा पुरविण्यासाठी मे. मनोहर एंटरप्रायझेस या कंपनीसोबत करार केला. देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीची प्रतिष्ठा मलीन व्हावी तसेच त्यांचा प्रतिष्ठित कंपनीतील करार रद्द व्हावा, यासाठी ‘एसआरएस एंटरप्रायझेस’चे मालक रहीम शेख, अझर शेख आणि मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज आणि विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात रोजंदारीवर कामासाठी पाठवले.
‘एसआरएस एंटरप्रायझेस’च्या रहीम, अझर आणि मझर यांच्या सांगण्यावरून कामगार फिरोज आणि विकी यांनी सामोसामध्ये निरोध टाकला. तसेच काही सामोसामध्ये दगड, विमल पान मसाला तंबाखूजन्य गुटखा टाकला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. या कंपनीचे देसाई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी फिरोज याला अटक केली.
अन्न प्रशासनाला दिली माहिती
गुन्हा दाखल करून चिखली पोलिसांनी या प्रकाराबाबत अन्न प्रशासनाला माहिती दिली आहे. निरोध, दगड, गुटखा टाकून खाद्यपदार्थ अपायकारक केल्याप्रकरणी अन्न प्रशासनाकडून अभिप्राय तसेच त्यांचा अहवाल मागविण्यात येणार आहे. याबाबत पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे.
कामगारांच्या आरोग्याशी खेळ?
या प्रकरणात खाद्य पदार्थ पुरविण्याचा कंत्राट मिळावा म्हणून सामोसामध्ये धोकादायक वस्तू मिसळल्याचे सांगण्यात येत आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.