धक्कादायक ! छेडछाडीला कंटाळून पीडितेसह आई-वडिलांचे विषप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 08:36 PM2019-05-27T20:36:02+5:302019-05-27T20:50:22+5:30
छेडछाड व मानसिक त्रासामुळे लग्न मोडल्याने १९ वर्षीय मुलीसह तिच्या आईवडिलांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
राजगुरूनगर (दावडी ) : टोकावडे (ता.खेड) येथे तरुणाकडून होत असलेली छेडछाड व मानसिक त्रासामुळे लग्न मोडल्याने १९ वर्षीय मुलीसह तिच्या आईवडिलांनी विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला असून आई व मुलगी बचावल्या आहेत.
गावातील एका युवकाने लग्न करण्याची धमकी देऊन वारंवार पीडित मुलीच्या आई-वडिलांना मानसिक त्रास दिला. तसेच पीडित मुलीचे जमलेले लग्न मोडले. त्यामुळे आई, वडील, मुलगी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी व आई सुदैवाने बचावल्या आहेत. वडिलांचा उपचारादरम्यान या घटनेत मृत्यू झाला.
खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; टोकावडे गावात पीडित मुलगी आई, वडील व भाऊ एकत्र राहत होते. त्याच गावातील मुलगा नितीन लिंबाजी मुऱ्हे पीडितेची नेहमी छेड काढत होता. पीडित मुलगी या त्रासाला कंटाळली होती. याबाबत १ महिन्यापूर्वी आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी मुऱ्हे याला जाब विचारला होता. त्रास न देण्याबाबत समजावून सांगितले होते. समजूत काढत असतानाही नितिनने पीडित मुलीच्या आई-वडिलांचा शिवीगाळ केली. तुमच्या मुलीचे लग्न माझ्याबरोबर लावून दिले नाही तर तिला पळवून नेईन. तिची व तुमची बदनामी करेन अशी धमकी दिली होती. त्यावेळी पीडित मुलीचे आई-वडील यांनी तुझी पोलिसांत तक्रार करू असे सांगितल्यावर पोलिसात तक्रार केली तर सगळ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेच्या आई-वडिलांनी घाबरून पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली नाही.
हा पीडित मुलीला वारंवार त्रास देऊन लग्न करण्यासाठी तिला व आई-वडिलांना धमकी देऊ लागला. त्यामुळे घरातील सर्वजण मानसिक तणावामध्ये होते. पीडित मुलीचे फोटो मोबाईलवर दाखवून बदनामी करेन अशी धमकी नितीन देत होता. दरम्यान पीडित मुलीचे लग्न मुंबई डोंबिवली येथे जमले होते. तेथेही जाऊन तु जर या मुलीशी लग्न केले तर तुझ्या घरच्यांना सोडणार नाही अशी धमकी तिच्या भावी नवऱ्याला दिली व लग्न मोडले. तुमच्या मुलीचे लग्न कुठे जमते तेच पाहतो अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेचे कुटुंब मानसिक तणावाखाली होते. तणावातच आई-वडील व मुलगी या तिघांनी विषारी औषध प्राशन केले. औषध पिल्यानंतर हे तिघेही घरात बेशुद्ध पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर लोकांनी व नातेवाईकांनी त्यांना राजगुरुनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे दोन दिवस उपचार करून त्यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले. उपचारानंतर आई व पीडित मुलीची प्रकृती व्यवस्थित आहे.
आरोपीस अटक
खेड पोलीस ठाण्यात नितीन मुºहे विरोधात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा याच्यावर दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.