धक्कादायक! रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन बेड मिळणे झाले कठीण, खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 01:03 PM2021-04-04T13:03:35+5:302021-04-04T13:04:20+5:30
वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला
तेजस टवलारकर
पिंपरी: शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला आहे. ज्या रुग्णांना गंभीर लक्षणे आहेत. ज्यांची ऑक्सिजन पातळी ही ९० पेक्षा कमी आहे. अशा रुग्णांना येथे दाखल केले जात आहे. परंतु रुग्ण वाढल्याने येथे ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच रुग्णांच्या रांगा लागत असल्याची स्थिती आहे. तर काही रुग्ण अक्षरशः खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
सद्यस्थितीत वायसीएम रुग्णालयातील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसरा मजल्यावरील दोन वार्ड मध्ये ही कोरोनाचे रुग आहेत, तर दोन वॉर्ड हे कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील एक आयसीयू कोरोना रुग्णांसाठी तर एक आयसीयू इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. फक्त चौथा मजला हा इतर रुग्णांसाठी राखीव ठेण्यात आला आहे. त्याच बरोबरच रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअरचे आयसीयू येत्या एक ते दोन दिवसात ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्याची स्थिती आहे.
रुग्णालयांमध्ये कोरोना आणि इतर आजारांच्या रुग्णाची ये-जा असते. त्यामुळे नेमका कोणता रुग्ण कोरोनाचा आहे, हे लक्षात येत नाही. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे असल्याने त्याचा परिणाम हा बाह्य रुग्णालयातील ओपीडिवर झाला आहे. रोज होणारी ओपीडी कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी असताना रोज साधारण १५०० रुग्णांची ओपीडी होत होती. सद्यस्थितीत रोज ५०० रुग्णांची ओपीडी होत आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता
कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी सध्या फक्त सात कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी १५ ते २० कर्मचाऱ्यांची गरज आहे. रुग्णाला दाखल करताना या कर्मचाऱ्यांना रुग्णासोबत जावे लागते. ज्या वॉर्ड मध्ये रुग्णाला दाखल केले तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जावे लागते. तसेच रुग्णालयात जागा नसल्यास इतर ठिकाणी रुग्णाला पाठविले तर तिथेही या कर्मचाऱ्यांना जावे लागते. रुग्णाला दाखल करून घेण्याची पूर्ण प्रक्रिया यांना करावी लागते. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाढविण्यात येणे गरजेचे झाले आहे. रुग्णालयात एकूण ५०० परिचारिका आणि वार्ड बॉयची गरज आहे. प्रत्यक्षात ३४५ कर्मचारी उपलब्ध आहेत. तर मदतनीस आणि इतर कामासाठी ३१५ कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या २५५ कर्मचारी आहेत.
रुग्णांची पसंती वायसीएमलाच
सुरुवातीपासून वायसीएमचा मृत्यू दर हा कमी आहे. सुविधा उपलब्ध आहेत. महापालिकेच्या इतर रुग्णांलय आणि जम्बो च्या तुलनेत रुग्ण वायसीएममध्ये दाखल होण्यासाठी रुग्ण आग्रह धरत असल्याची स्थिती आहे.
अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू
रुग्णालयात सध्या फक्त अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुरू आहे. इतर शस्त्रक्रिया बंद आहेत.