निष्काळजीपणाचा कळस! कंपनीच्या ठेकेदाराने माहिती लपवत ३२ कोरोनाबाधित कामगारांना ठेवले गोदामात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:51 PM2021-05-18T16:51:11+5:302021-05-18T16:55:32+5:30
खेड तालुक्यातील मरकळ येथील धक्कादायक घटना.....
शेलपिंपळगाव : मरकळ (ता.खेड) येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या ३२ कामगारांना कोरोनाची लागण झाली. मात्र, कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती संबधित कामगार ठेकेदाराने लपवत संबंधित सर्व रुग्णांना कंपनीच्या पत्राशेडच्या गोदामातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने उघडकिस आणला आहे. अशा घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबधित कंपनीला नोटीस बजावुन त्या ३२ कामगारांना उपचारासाठी महाळुंगे कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. प्रशासनाने योग्य वेळी दाखल घेतली म्हणून भविष्यातला कोरोना पसरण्याचा आणि कामगारांच्या आरोग्याचा धोका टळला आहे.
मरकळ ग्रामपंचायत हद्दीत अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, पंचायत समिती सदस्य अरूण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी आढावा घेतला. दरम्यान कोरोना बाधित ३२ कामगार कंपनीच्या गोदाममध्ये वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे.