धक्कादायक! पिंपरी-चिंचवड शहर परिसरात टेलिकाॅलर महिलेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:40 PM2022-02-01T14:40:04+5:302022-02-01T14:44:11+5:30
जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला
पिंपरी : विवाहित टेलिकाॅलर महिलेने कर्ज देण्यासाठी एका व्यक्तीला फोन केला. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्याने त्याचे पहिले लग्न झाल्याचे न सांगता महिलेसोबत लग्न केले. लग्नाच्या दिवशी महिलेला पहिल्या लग्नाबाबत सांगून तिची फसवणूक केली. तसेच तिच्यावर बलात्कार केला. मोरेवस्ती, चिखली येथे २०१५ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
महेश दिनकर इंदलकर (वय ४१, रा. लोहगाव, पुणे), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित ३५ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. फिर्यादी पीडित महिलेचे पहिले लग्न झाले असून फिर्यादी एका खासगी कंपनीत टेलिकाॅलर म्हणून नोकरी करीत होत्या. कर्ज देण्यासाठी विविध मोबाईल क्रमांकावर फोन करून संबंधित व्यक्तीला कर्ज योजनेबाबत माहिती देण्याची जबाबदारी फिर्यादी महिलेकडे होती.
दरम्यान, कर्ज योजनेची माहिती देण्यासाठी फिर्यादी महिलेने काॅल केला असता आरोपी इंदलकर याच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी संपर्क साधला. माझे लग्न झाले आहे, असे फिर्यादी महिलेने आरोपीला सांगितले. त्यानंतरही आरोपी हा फिर्यादी महिलेच्या संपर्कात राहिला. यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले. आरोपीने फिर्यादी महिलेला त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे न सांगता खोटे आश्वासन दिले.
फिर्यादीसोबत मंदिरात लग्न करताना पहिल्या लग्नाबाबत आरोपीने सांगितले. लग्न झाल्यावर आरोपीने पहिल्या पत्नीसोबत फिर्यादीला देखील सांभाळतो, असे खोटे आश्वासन देत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीसोबत त्यांच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे तपास करीत आहेत.