खळबळजनक! खेड-शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या; तब्बल सव्वा दोन कोटींचा गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 12:54 PM2021-03-04T12:54:11+5:302021-03-04T12:54:55+5:30
दोन महिन्यांपासून सुरु होता प्रकार; ७ जणांना अटक
पुणे : पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोलनाका आणि आणेवाडी टोलनाका या ठिकाणी बनावट पावत्या २ महिन्यांपासून वापरली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे. गेल्या २ महिन्यांत सुमारे २ कोटी २८ लाख रुपयांच्या अशा बनावट पावती पुस्तकांद्वारे टोलवसुली केल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
सुरेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा. वाई, सातारा), अक्षय तानाजी सणस (वय २२, रा. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (वय १९, रा. जनता वसाहत,पुणे), साई लादूराव सुतार (वय २५, रा. कात्रज, पुणे), अजय काशीनाथ चव्हाण (वय १९, रा. वाई, सातारा), संकेत जयंत गायकवाड (वय २२, रा.जावळी, सातरा), अमोल कोंडे (वय ३६, रा.खेड शिवापूर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. खेड शिवापूर टोलनाक्याच्या ऑडिट रिपोर्ट दरम्यान २४ फेब्रुवारी रोजीच्या पाहणीत सुमारे २ हजार वाहने २४ तासांच्या कालावधीत ३ लाख ८० हजार बनावट पावत्या देऊन सोडून देण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार सुरेश गंगावणे, अक्षय सणस, शुभम डोलारे, साई सुतार यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे टोलवसुली वापरत असलेल्या बनावट पावत्या जप्त करण्यात आल्या.
खेड शिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या तयार करुन वाहन चालकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार अभिजित बाबर (रा.मंगळवार पेठ,पुणे) यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर टोलनाका येथे खातरजमा केली असता, त्या ठिकाणचे टोल कर्मचारी शेवटच्या लेन मध्ये टोलवसुलीची १९० रुपयांची बनावट पावती देऊन फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे साथीदार हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे व इतर साथीदार यांचेवर टोल नाक्यावर वाहनचालकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
कॉन्ट्रक्टर पोलिसांच्या रडारवर
टोल कर्मचारी पुणे-सातारा टोल रोड प्रा.लि. या कंपनीस टोलची पावती देत असते, त्याचप्रमाणे बनावट पावती आरोपी लॅपटॉपला प्रिंटर लावून पर्यायी सॉफ्टवेअर द्वारे पावती छापत असल्याचे चौकशीत समोर आाले आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अजय चव्हाण, संकेत गायकवाड, अमोल कोंडे यांनाही अटक करण्यात आली आहे. अमोल कोंडे या कॉन्ट्रॅक्टर सोबतच विकास आण्णा शिंदे (वाई, सातारा), मनोज दळवी (भोर,पुणे), सतीश मरगजे, हेमंत बाठे हे फरार झालेल्या कॉन्ट्रॅक्टरचा पोलीस शोध घेत आहे.
........
या बनावट टोल पावत्यांचा घोटाळा हा खूप मोठा असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. या घोटाळ्याशी संबंधित सर्व बाबींची कसून चौकशी करण्यात येत असून त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
साडेचार कोटींपेक्षा अधिक गैरव्यवहाराची शक्यता
खेड-शिवापूर टोलनाक्यावरील बनावट पावत्यांची तपासणी केल्यावर आतापर्यंत २ कोटी २८ लाख रुपयांचा टोल वसूल केल्याचे आढळून आले आहे. ही तपासणी २४ फेब्रुवारीपर्यंतची आहे. याशिवाय आणे टोलनाका पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत येत नाही. तेथील चौकशी करण्यात आलेली नाही. त्यामुळे टोलनाका गैरव्यवहारातील आकडा सुमारे साडेचार कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.