TET Exam: पेपरफुटी प्रकरणाबद्दल पुणे पोलिसांचे धक्कादायक खुलासे; आरोपींकडे सापडले ८८ लाख रुपये आणि सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 04:00 PM2021-12-17T16:00:27+5:302021-12-17T16:02:26+5:30
या पत्रकार परिषदेत बोलताना अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले, आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, त्यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता...
पुणे: पुणे पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक केली आहे. या कारवाईनंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी याप्रकऱणी पत्रकार परिषदेत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याच्यासोबत आणखी एकाला अटक केल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली. तसेच या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचेही सांगितले
या पत्रकार परिषदेत बोलताना अमिताभ गुप्ता पुढे म्हणाले, आम्ही दोन पेपरफुटीची प्रकरणं हाताळत होतो, त्यामध्ये प्राथमिकपणे आरोग्य भरतीचा तपास सुरु होता. त्यावेळी आम्हाला MHADA च्या परीक्षेतील गैरव्यवहाराबद्दल माहिती हाती लागली होती. परीक्षा होण्याच्या एक दिवस अगोदर रात्री सर्वांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरु असताना TET च्या परीक्षेतही गडबड झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. २०२० वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली होती. टीईटीच्या परीक्षेत जो काही गैरप्रकार सुरु होता त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली आहे. तुकाराम तुपे यांच्यासोबत आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
कारवाईवेळी आरोपींकडे ८८ लाख रुपये रोख, काही सोनं आणि एफडी सापडल्या असल्याची माहितीही गुप्ता यांनी दिली.
काय होती मोडस ऑपरेंडी –
या परीक्षा घेतल्यानंतर काही उमेदवारांना परीक्षेचा बैठक क्रमांक लिहू नका सांगितलं जायचं. स्कॅनिंग करताना तो नंबर लिहिला जायचा. जर कोणी राहिलं असेल तर त्यांना पेपर पुन्हा तपासणीसाठी द्या सांगायचे आणि नंतर त्यात बदल केले जायचे, अशी माहितीही अमिताभ गुप्ता यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना गुप्ता म्हणाले, प्रत्येक उमेदवाराकडून ३५ हजार ते १ लाखांपर्यंतची रक्कम घेतली जात होती. आमच्या माहितीप्रमाणे साडे चार कोटी जमा झाले होते असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या ९० लाख जप्त केले आहेत. याप्रकरणी अजून तीन ते चार जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.