धक्कादायक ! बनावट सही ठाेका, पुणे महापालिकेची तिजाेरी लुटा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:20 PM2021-01-25T12:20:19+5:302021-01-25T12:33:28+5:30
अधिकाऱ्यांनी दिवसाढवळ्या संगनमताने मारला पाच काेटींचा डल्ला
दीपक मुनोत-
पुणे: महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये अदा करण्यात आल्याचा गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकारी यांच्या संगनमताने हा गैरप्रकार झाल्याची चर्चा आहे.
पुणे महापालिकेच्या मलनि:सारण प्रकल्प या विभागामध्ये हा घोटाळा झाला आहे. या विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार, कार्यकारी अभियंता सुश्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यानंतर २७ नोव्हेंबर २०१९ रोजी, अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांचीच हूबेहूब बनावट स्वाक्षरी करून ʻपाटील कन्सट्रक्शन ॲंड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडʼ या ठेकेदाराला, ४ कोटी ८८ लाख २४ हजार ५०५ रूपयांचे बिल परस्पर अदा करून टाकले. दरम्यान, खांडवे यांनी ʻतीʼ सही आपण केली नसल्याचे ʻलोकमतʼ बरोबर बोलताना स्पष्ट केले आहे.
मलनि:सारण विभागाच्या प्रकल्प विभागाने, संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचे ५६ कोटी ५७ लाखाचे कंत्राट २०१७ साली दिले आहे. त्यानूसार, शहरातील सुमारे ५१ किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये ३६ ठिकाणी उघड्यावर वाहणारे मैलापाणी हे बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रापर्यंत वाहून नेण्यात येणार आहे. या कंत्राटातील, बारावे रनिंग बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला आहे.
महापालिकेच्या, मलनि:सारण विभागाचा प्रकल्प विभाग, मुख्य लेखा परीक्षक कार्यालयासह अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतकी मोठी रक्कम अदा करताना अगदी प्राथमिक निकषही न पाळता हेतूत: दुर्लक्ष केल्याचे, प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. परिणामी संगनमताने पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
एरवी, ठेकेदार हा काम पुर्ण झाल्यानंतर फार फार तर पंधरवड्यात मोबदल्याचे बिल सादर करतो आणि पैसे वसूल करतो. मात्र हे वादग्रस्त प्रकरण त्यास अपवाद ठरले आहे. संबंधित काम हे जानेवारी २०१९ मध्येच पुर्ण झाले असे बिलावर ʻकागदोपत्रीʼ दर्शवण्यात आले आहे. प्रत्यक्षात बिल हे पंधरवडा- महिनाभरात नव्हे तर तब्बल दहा महिने विलंबाने सादर करण्यात आले. एरवी, बिल वसुलीसाठी घाईगर्दी केली जात असताना कनिष्ठ, उप अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी खांदवे यांच्या निवृती पर्यंतची वाट पाहिली, ही बाब देखील गैरप्रकार झाल्याच्या संशयाला पुष्टी देणारी आहे.
बोगस आणि कागदोपत्री कामांच्या बिलांना थारा न देणाऱ्या खांदवे यांच्या सेवानिवृत्तीनंतर मात्र त्यांच्याच सहकाऱ्यांनी ʻडावʼ साधला, आणि बनावट सही करून करदात्यांच्या कोट्यवधी रूपयांवर डल्ला मारला आहे.
...................................
ʻत्याʼ बिलावर मी सही केलेली नाही. महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेत मी अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर तर अशी सही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
- संदीप खांडवे, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता
.....................
नेमके काय झाले आहे त्याचा तपास सोमवारी करते.
- उल्का कळसकर, मुख्य लेखापाल, पुणे महापालिका.
..................
हे धक्कादायक आहे..या प्रकरणाची तातडीने चौकशी करतो.
- सुरेश जगताप, अतिरिक्त महापालिका आयुक्त.