धक्कादायक! ससून रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना रात्रीच्या वेळी काढले हॉटेलबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 09:04 PM2020-10-02T21:04:35+5:302020-10-02T21:06:53+5:30
ससूनमधील कोविड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व्यवस्था विविध हॉटेल व लॉजमध्ये करण्यात आली आहे...
पुणे : क्षमतेपेक्षा जास्त संख्या झाल्याचे कारण देत हॉटेल चालकाने ससून रुग्णालयातील कंत्राटी परिचारिकांना रात्री आठ वाजता हॉटेलबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकांनी विनंती केल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा त्यांना राहण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यान, ससून रुग्णालय प्रशासनाने संबंधित हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली आहे.
ससूनमधील कोविड रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची व्यवस्था पुणे स्टेशन परिसरातील विविध हॉटेल व लॉजमध्ये करण्यात आली आहे. सध्या सुमारे ५०० जण हॉटेलमध्ये राहत आहेत. पुणे स्टेशन परिसरातील नॅशनल हॉटेलमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत सुमारे ६० कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये बहुतांश कंत्राटी परिचारिका आहेत. त्यांना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापनाकडून पूर्वकल्पना न देता हॉटेलबाहेर जाण्यास सांगितले. रात्री अचानक बाहेर जाण्यास सांगितल्याने परिचारिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अखेर खुपवेळ विनंती केल्यानंतर त्यांना रात्री हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी देण्यात आल्याचे संबंधित कंत्राटदाराने सांगितले.
ससूनचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजय तावरे यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याची विनंती बंडगार्डन पोलिसांना केली आहे. हॉटेल व्यवस्थापनाने याबाबत जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासनाला आगाऊ सुचना देणे अपेक्षित होते. पण तसे न करता त्यांच्याशी गंभीर स्वरूपाचे वर्तन केले आहे. त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवावा, अशी विनंती डॉ. तावरे यांनी पोलिसांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या घटनेविषयी रुग्णालयात आवाज उठविण्यात आला. परिचारिकांशी केलेल्या वर्तनाबद्दल हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई करणयची मागणी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.
--------------
‘नॅशनल हॉटेलमध्ये ४० परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण तिथे सुमारे ७० परिचारिका राहत होत्या. त्यामुळे त्यांची व्यवस्था अन्यत्र करण्याची विनंती केली होती,’ असे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडून याबाबत खुलासा घेऊन कार्यवाही केली जाईल.
- ससून रुग्णालयातील कंत्राटी तृप्ती कोलते, तहसिलदार